तेराव्या वर्षीच तिला लागले मृत्यूनंतरच्या जगाचे वेध; 'डेथ इज दी गोल' म्हणत संपवले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2022 03:24 PM2022-04-05T15:24:56+5:302022-04-05T15:31:41+5:30
अत्यंत हुशार असलेल्या आर्याला मृत्युनंतरचे जग कसे असते, याचे प्रचंड कुतूहल होते. आय लाइक डेथ, आय डोन्ट लाइक लाइफ. मृत्यूने लवकर यावे, असे तिचे विचार होते. ते तिने वेगवेगळ्या बुकमध्ये लिहून ठेवले होते.
नागपूर : वय वर्षे १३, शिक्षण आठवी मात्र तिला या छोट्याशा वयातच मृत्युनंतरच्या जगाचे कुतूहल वाटू लागले. तसे ती तिच्या नोटबुकमध्ये लिहू लागली अन् अखेर तिने सोमवारी दुपारी तिने आत्मघात करून घेतला.
आर्या हरिश्चंद्र मानकर (वय १३ वर्षे) असे तिचे नाव आहे. चंद्रमणी नगरात राहणाऱ्या आर्याचे वडील एका शिक्षण संस्थेत कार्यरत असून, तिची आई गृहिणी आहे. तिला मोठा भाऊ आणि बहीण आहे. ते दोघेही शिक्षण घेतात. आर्या माउंट कॉर्मेल स्कूलमध्ये ८ वीत शिकत होती. अत्यंत हुशार असलेल्या आर्याला मृत्युनंतरचे जग कसे असते, याचे प्रचंड कुतूहल होते. त्यामुळे वेगवेगळ्या थिंकरचे भाष्य वाचत होती. ते आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवत होती.
मिथिला पाटकर, डॉ. हंसा योगेंद्र यांचे या संबंधीचे काही उतारेही तिने लिहून ठेवले होते. ‘डेथ इज दी गोल, मॅच्युरिटी इज दी वे’ असा विचार तिने ठळकपणे नोंदवून ठेवला होता. घरच्या-बाहेरच्यांशी वागताना ती तशी सामान्यच वागत होती. मात्र, नंतर ती वेगळ्याच विश्वात हरवत होती.
सोमवारी दुपारी १.३०च्या सुमारास ती, तिचा भाऊ आणि आई घरात होते. आई आंघोळीला गेली, तर भाऊ अभ्यासात गुंतल्याचे बघून तिने गळफास लावून घेतला. आई आंघोळीवरून परतल्यानंतर आर्या गळफास लावलेल्या अवस्थेत दिसताच, तिने हंबरडा फोडला. लगेच भाऊ धावून आला. मायलेकांनी आर्याला खाली उतरविले. डॉक्टरला दाखविले असता, त्यांनी आर्याला मृत घोषित केले. दरम्यान, तिचे वडील हरिश्चंद्र मानकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
नकारात्मकतेकडे वाटचाल
आय लाइक डेथ, आय डोन्ट लाइक लाइफ. मृत्यूने लवकर यावे, असे तिचे विचार होते. ते तिने वेगवेगळ्या बुकमध्ये लिहून ठेवले होते. तिची ही नकारात्मकतेकडची वाटचाल काही महिन्यांपासून सुरू झाली होती. मात्र, घरच्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. छोटी आहे, असे समजून तिच्याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर तिने स्वत:ला संपविले.