वर्षभरात १.३२ लाख नवीन वीज जोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:12 AM2017-10-04T01:12:32+5:302017-10-04T01:16:00+5:30

वीज ग्राहकांना योग्य दाबाने व अखंडित वीजपुरवठा व्हावा, यासाठी महावितरणे विदर्भात तब्बल ११७ वीज उपकेंद्रे प्रस्तावित केलेली आहेत; त्यापैकी २९ उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली आहेत.

1.32 lakh new power connections in the year | वर्षभरात १.३२ लाख नवीन वीज जोडण्या

वर्षभरात १.३२ लाख नवीन वीज जोडण्या

Next
ठळक मुद्देमहावितरणचा प्रभावी ग्राहकसेवेचा दावा : वर्षभरात उभारली २९ उपकेंद्रे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज ग्राहकांना योग्य दाबाने व अखंडित वीजपुरवठा व्हावा, यासाठी महावितरणे विदर्भात तब्बल ११७ वीज उपकेंद्रे प्रस्तावित केलेली आहेत; त्यापैकी २९ उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली आहेत. अनेक भागातील वीजपुरवठ्याच्या समस्या निकाली लागल्या आहेत. गेल्या वर्षभरात सुमारे १.३२ लाख नवीन वीज जोडण्या देण्यात आल्याची माहिती महावितरणच्या प्रादेशिक संचालक कार्यालयाने दिली.
वीज ग्राहकांना लहानसहान कामांसाठी वारंवार मुंबईला जाण्याची गरज भासू नये, अनेक प्रकारच्या प्रस्तावांना स्थानिकस्तरावरच मंजुरी मिळावी, यासाठी महावितरणच्या कामांचे विकेंद्रीकरण करण्याची संकल्पना राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्षात अंमलात आणली. त्यांच्या पुढाकाराने २ आॅक्टोबर २०१६ पासून संपूर्ण विदभार्साठी नागपूर येथे प्रादेशिक संचालक कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. एक वर्षाच्या कार्यकाळात या कार्यालयाने प्रभावी आणि तत्पर ग्राहकसेवेसाठी विविध उपक्रम हाती घेतले.
ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद वाढवून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यावर विशेष भर दिला. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करीत, प्रादेशिक संचालक कार्यालयाने पहिल्या वर्षातच ग्राहकसेवेमध्ये यशाचे उंच शिखर गाठले. विदर्भात महावितरणचे सुमारे ४७ लाख वीज ग्राहक असून, त्यापैकी तब्बल ७० टक्के वीज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली. ग्राहकांच्या तक्रारींचे थेट निराकरण करण्यासोबतच त्यांनी केलेल्या विजेचा मासिक वापर, वीज देयक, वीज खंडित होणार असल्याच्या सूचनेसोबतच अनेक महत्त्वाची माहिती थेट एसएमएसच्या माध्यमातून दिली जाते.
ग्राहकांना अचूक वीजबिल मिळावे यासाठी विदभार्तील अडीच हजारांपेक्षा अधिक उच्चदाब ग्राहकांना स्वयंचलित मीटर वाचन पद्धतीने नोंदी घेत वीजबिल दिल्या जाते. लघुदाब औद्योगिक ग्राहकांसाठीही ही पद्धत नुकतीच सुरू करण्यात आली आहे. याशिवाय महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून लघुदाब ग्राहकांचे मीटर वाचन होत आहे. त्यात मानवी हस्तक्षेप पूर्णपणे नाहीसा करण्यात महावितरणला विशेष यश मिळाले आहे. एखाद्या ग्राहकाच्या मीटरचे वाचन काही कारणास्तव झाले नसल्यास ग्राहकाला स्वत: आपल्या मीटरचा फोटो पाठविण्याची सुविधाही या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे.
विदर्भातील शेततळ्यांमधील पाण्याचा उपसा करण्यास योग्य दाबाने वीजपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी पूर्व विदर्भ स्पेशल पॅकेज अंतर्गत तब्बल ७०० कोटींची योजना मंजूर झाली असून त्यापैकी ३५० कोटींची कामेही प्रस्तावित करण्यात आली आहेत.
शहरी भागातील वीज वितरण यंत्रणा बळकटीकरणासाठी एकात्मिक विद्युत विकास योजना आणि ग्रामीण भागासाठी दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेंतर्गत प्रादेशिक संचालक नागपूर यांच्या कार्यक्षेत्रात मोठ्याप्रमाणात विकासकार्ये सुरू असून त्यापैकी अनेक कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. महावितरणचा एकूणच आर्थिक डोलारा लक्षात घेता वीज ग्राहकांनीही अधिकृत विजेचा वापर करून नियमितपणे वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी केले आहे.

Web Title: 1.32 lakh new power connections in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.