नागपूरनजीकच्या कामठीतील आयटीआय इमारतीसाठी १३.५१ कोटीच्या निधीला मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:32 PM2018-10-29T22:32:33+5:302018-10-29T22:43:04+5:30
जिल्ह्यातील कामठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय व कार्यशाळा इमारत बांधकामासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने १३.५१ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी हा निधी आयटीआयला प्राप्त होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील कामठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय व कार्यशाळा इमारत बांधकामासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने १३.५१ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी हा निधी आयटीआयला प्राप्त होणार आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांनी कामठीच्या आयटीआय प्रशासकीय व कार्यशाळा इमारतीसाठ़ी १४ कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. साडेतेरा कोटींच्या या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली. तळमजला अधिक पहिला मजला असे बांधकाम असलेल्या या इमारतीचे अंदाजपत्रक उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम यांनी तयार केले आहे. बांधकाम सुरू करण्यापूर्वी शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करण्यात यावे. या कामाची सुरुवात २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून करण्याची सूचना शासनाने केली आहे.
प्रशासकीय बांधकाम २०६१ चौ. मीटर जागेवर होणार असून इलेक्ट्रिफिकेशन, पाणीपुरवठा व स्वच्छता, कंपाऊंड वॉल आणि प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते व पाणी वाहून नेण्याच्या नाल्या, फर्निचर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पार्किंग परिसराचा विकास आणि हरित इमारत संकल्पनेनुसार हे बांधकाम होणार आहे. आयटीआयच्या या इमारतीमुळे ग्रामीण भागातील युवकांना आता शहरी भागाकडे शिक्षणासाठी जाण्याची आवश्यकता राहणार नाही.