विळखा तंबाखूचा! १,३९४ लोकांचे तोंडच उघडेना; खाण्याचे वांधे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 07:30 AM2022-11-15T07:30:00+5:302022-11-15T07:30:01+5:30
Nagpur News शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत हे व्यसन असलेल्या १,३९४ रुग्णांचे तोंडच उघडत नसल्याचे आढळून आले. हे मुख पूर्वकर्करोगाचे लक्षण आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : सहजपणे उपलब्ध होणारे तंबाखूजन्य पदार्थ, जाहिरातींचा प्रभाव आणि एकदा चव घेण्याचा मोह आदी कारणांमुळे शालेयसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत हे व्यसन असलेल्या १,३९४ रुग्णांचे तोंडच उघडत नसल्याचे आढळून आले. हे मुख पूर्वकर्करोगाचे लक्षण आहे.
राज्यात कुठे नसतील एवढे पानठेले एकट्या विदर्भात आहेत. यातील बहुसंख्य पानठेल्यांवरून खर्ऱ्याची विक्री होते. अलीकडे किराणा दुकानांमधूनही खर्ऱ्याची विक्री होत असल्याने लहानपणापासूनच खर्ऱ्याचे व्यसन लागत आहे. परिणामी, वयाच्या तिशीतच कर्करोगाची लागण झाल्याची शेकडो उदाहरणे समोर येत आहेत. राज्यात मुखाच्या कर्करोगात विदर्भ राजधानी ठरू पाहत आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात रोज २०० ते २५० नवे, तर तेवढेच जुने रुग्ण येतात. साधारण ५०० रुग्णांमध्ये तीन ते चार रुग्ण हे खर्रा व इतर कारणांमुळे तोंड न उघडणारे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-तरुणांची संख्या अधिक
तोंड न उघडणाऱ्यांमध्ये १५ ते ४० वयोगटातील व्यक्तींची संख्या मोठी आहे. खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे मुख्य कारणही पुढे आले आहे. खर्ऱ्यामुळे हे तरुण कॅन्सरच्या उंबरठ्यावर उभे असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
-मुखाचा कर्करोग होण्याचे मुख्य कारण तंबाखू
क्वचितच अपवाद वगळता मुखाचा कर्करोग होण्याचे मुख्य कारण हे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे हेच असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तोंडाचा कर्करोग हा गाल, जीभ, ओठ, टाळू, हिरड्या, जिभेखालील भाग अशा तोंडाच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. याचे वेळीच निदान न झाल्यास आजार गंभीर होतो.
-मुख पूर्वकर्करोग बरा करून नवे आयुष्य देण्याचा प्रयत्न
मुख पूर्वकर्करोगाला वैद्यकीय भाषेत ‘ओरल सबम्यूकस फायब्रोसिस’ व मुख कर्करोगाला ‘ओरल स्क्वॅमस सेल कार्सिनोमा’ म्हणतात. खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थांमुळे अनेकांचे तोंड उघडत नाही. हे मुख पूर्वकर्करोगाचे लक्षण आहे. लहान वयात झालेला मूख पूर्वकर्करोग साधारण दहा वर्षांनंतर मुखाच्या कर्करोगात बदलतो. यामुळे अशा रुग्णांमधील मुख पूर्वकर्करोग बरा करून त्यांना मूख कर्करोगाकडे जाऊ न देण्याचा व नवे आयुष्य देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
-डॉ. अभय दातारकर
अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय