नागपुरातील उद्योगांमध्ये कार्यरत १४ कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 12:00 AM2020-06-19T00:00:33+5:302020-06-19T00:02:22+5:30
राज्य शासनाच्या परवानगीनंतर १ जूनपासून अनलॉक-१ मध्ये सुरू झालेल्या एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांमध्ये कार्यरत आणि क्षेत्रालगत राहणारे कर्मचारी कोविड-१९ पॉझिटिव्ह निघाले आहेत. उद्योगांमधील जवळपास ६० कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यापैकी १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाच्या परवानगीनंतर १ जूनपासून अनलॉक-१ मध्ये सुरू झालेल्या एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांमध्ये कार्यरत आणि क्षेत्रालगत राहणारे कर्मचारी कोविड-१९ पॉझिटिव्ह निघाले आहेत. उद्योगांमधील जवळपास ६० कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यापैकी १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे संक्रमण हिंगणा एमआयडीसी क्षेत्रात पसरले आहे.
जिल्ह्यातील अन्य उद्योगांमध्ये कोविड-१९ चे संक्रमण पसरण्याची शक्यता पाहता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलविली. यामध्ये सर्व उद्योगांना अटी आणि नियमांचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. याकरिता विशेष कृती दलाची स्थापना करण्यात येणार आहे. कृती दल उद्योगांचे आकस्मिक निरीक्षण करणार आहे. यादरम्यान कोणताही कर्मचाऱ्यामध्ये कोविड-१९ ची लक्षणे आढळून आल्यास उद्योजकांना याची सूचना तहसील कार्यालयाला द्यावी लागेल. त्यानंतर संबंधित उद्योगात कोविड-१९ चे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यास उद्योग तीन दिवसासाठी बंद करण्यात येणार आहे.
लॉकडाऊनदरम्यान नागपूर जिल्ह्यातील उद्योजकांनी जिल्हा प्रशासनाला नेहमीच सहकार्य केले आहे. यासोबतच शासकीय अटी आणि नियमांचे पालन केले आहे. नागपूर जिल्ह्यातील जवळपास २५०० उद्योग ५० ते ६० टक्के क्षमतेने काम करीत आहेत. प्रवासी मजूर न परतल्यास उद्योगांमध्ये मजूरांची कमतरता भासणार आहे. परंतु उद्योजकांतर्फे स्थानिक मजुरांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहसंचालक (उद्योग), डीआयसी महाव्यवस्थापक रोजगार कार्यालय आणि कौशल्य विकास विभाग आवश्यक सहकार्य करीत आहे.
एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगांवकर, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अमर मोहिते आणि विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन अध्यक्ष सुरेश राठी यांनी सर्व उद्योजकांना अटी आणि नियमांचे सक्तीने पालन करण्याचे आवाहन केले आहे.