एटीएम कॅश व्हॅनमधून १४ लाख पळविले

By admin | Published: July 13, 2017 02:27 AM2017-07-13T02:27:18+5:302017-07-13T02:27:18+5:30

शहरातील अतिशय वर्दळीच्या झांशी राणी चौकातील बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये रक्कम भरण्यासाठी आलेल्या व्हॅनमधील

14 lakhs from ATM Cash Van | एटीएम कॅश व्हॅनमधून १४ लाख पळविले

एटीएम कॅश व्हॅनमधून १४ लाख पळविले

Next

झांशी राणी चौकातील घटना : तीन तासानंतर पोलिसांना मिळाली माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील अतिशय वर्दळीच्या झांशी राणी चौकातील बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये रक्कम भरण्यासाठी आलेल्या व्हॅनमधील १४ लाख रुपये रोख रक्कम असलेली पेटी चोरट्यांनी लंपास केली. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेची पोलिसांना अतिशय उशिरा माहिती देण्यात आली. बंदूकधारी सुरक्षा गार्ड उपस्थित असताना ही चोरी झाल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीसही या घटनेमुळे हादरले आहेत. बँकेच्या कर्मचाऱ्यांची विचारपूस केली जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार बँक आॅफ इंडियाने एका खासगी कंपनीला (एसआयएससी) त्यांच्या एटीएममध्ये रोख रक्कम जमा करण्याचे काम दिले आहे. एसआयएससी कंपनीचा कस्टोडियन कर्मचारी नीलेश दारोटे (१८) हा आपला एक सहकारी, सुरक्षा गार्ड आणि वाहनासह मंगळवारी दुपारी १.३० वाजता बँक आॅफ इंडियाच्या किंग्सवे येथील विभागीय कार्यालयातून
एक कोटी पाच लाख रुपयाची रोख रक्कम घेऊन व्हॅन क्रमांक एम.एच. १९/बीएम/१२६३ ने निघाले. त्यांना ही रक्कम शहरातील विविध एटीएममध्ये भरावयाची होती. विभागीय कार्यालयातून निघून ते रिझर्व्ह बँक चौकातील अलाहाबाद बँकेच्या एटीएममध्ये पोहोचले. तिथे पैसे भरल्यावर ते गोळीबार चौक, अग्रसेन चौक, रेशीमबाग चौक, भांडे प्लॉट चौक, कळमना, क्वेटा कॉलनी, वैशालीनगर, सुगतनगर, जरीपटका, कडबी चौकमार्गे कळमेश्वरला गेले. कळमेश्वरवरून परत आल्यावर शंकरनगर चौकातील एटीएममध्ये रुपये भरले. यानंतर सायंकाळी ६.३० वाजता झांशी राणी चौक येथील येथील एटीएमजवळ आले. झांशी राणी चौकातील एटीएममध्ये पाच लाख रुपये भरल्यानंतर त्यांना बुटीबोरीच्या एटीएममध्ये १४ लाख रुपये जमा करायचे होते. तिथे गेल्यावर व्हॅनमधील स्ट्राँग रुममध्ये ठेवलेली नोटांची पेटी गायब होती. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर रात्री १०.३० वाजता धंतोली पोलीस ठाण्यात पोहोचले. तेव्हा पोलिसांना याबाबत माहिती मिळाली.
पोलिसांना एसआयएससी कर्मचारी नीलेश दरोटे याने दिलेल्या माहितीवर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी दरोटे व इतर कर्मचाऱ्यांना सक्तीने विचारपूस केली. परंतु कुठलीही माहिती न मिळाल्याने पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
बोलेरो व्हॅनमध्ये चालकासोबत कर्मचारी बसतो. त्यांच्या मागे सुरक्षा रक्षकासह दुसरा कर्मचारी बसतो. बोलेरो व्हॅनच्या मागच्या बाजुला ‘स्ट्राँग रूम ’ आहे. ते तीन बाजूंनी बंद आहे. तर त्याचा दरवाजा गार्डच्या सीटजवळून उघडतो. नीलेशने दिलेल्या माहितीनुसार तो आपल्या साथीदारासह झाशी राणी चौकातील एटीएममध्ये रक्कम जमा करण्यासाठी आत गेला. व्हॅनचा सुरक्षा रक्षकही त्याच्यामागे येऊन एटीएमसमोर उभा झाला. चालक अतुल मोडक व्हॅनमध्येच बसून होता. अतुलचे म्हणणे आहे की, नीलेश एटीएमध्ये जाताच एक युवक त्याच्याजवळ आला. त्याने अतुलला सर आपले पैसे खाली पडले असल्याचे सांगितले. अतुलने खाली वाकून पाहिले तेव्हा खाली दहा-दहा रुपयाचे नोट पडले होते. अतुलचे म्हणणे आहे की, तो नोट उचलू लागला. त्याने दहा-दहा रुपयाचे पाच नोट उचलले. रुपये उचलल्यानंतर तो नीलेश व त्याचा सहकाऱ्याला पाहण्यासाठी एटीएमजवळ गेला. तेव्हा ते परत येत असल्याचे पाहून तो पुन्हा व्हॅनमध्ये बसला आणि गाडीसह सर्वजण बुटीबोरीला निघून गेले. बुटीबोरीत पोहोचल्यावर चोरी झाल्याचे उघडकीस आले.
या घटनेवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ज्या वेळी ही घटना घडली, त्या वेळेला झाशी राणी चौकात खूप वर्दळ असते. चोरी गेलेली लोखंडी पेटी काढण्यासाठी व्हॅनचा दरवाजा उघडण्याची गरज आहे. त्यासाठी आरोपीला व्हॅनमध्ये जावे लागले असेल. व्हॅनमधील स्ट्राँग रुमचा दरवाजा उघडण्यापासून तर लोखंडी पेटी बाहेर काढून फरार होतपर्यंत कुणाचीच नजर चोरांवर कशी पडली नाही, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
व्हॅन चालक एका युवकाने फसवल्याचे सांगत आहे. चोरीचा हा प्रकार दक्षिण भारतीय गँग वापरत असते. ते सामान्य नागरिकांना लक्ष्य बनवतात. पहिल्यांदाच त्यांनी कॅश व्हॅनमधून रोख रक्कम लंपास केली आहे. कॅश व्हॅनमध्ये नेहमीच कोट्यवधी रुपये असतात. यामुळे त्याच्या सुरक्षेसाठी बंदुकधारी सुरक्षा गार्ड आणि प्रशिक्षित लोकांनाच तैनात केले जाते. त्यांच्याकडून चूक होण्याची शक्यता नसते. परंतु ताज्या घटनेवरून कॅश व्हॅनची सुरक्षा ‘रामभरोसे’ असल्याचे दिसून येते. धंतोली ठाण्याच्या निरीक्षक सीमा मेहंदळे यांनी सांगितल्यानुसार प्रत्येक बाजूंनी तपास केला जात आहे.

 

Web Title: 14 lakhs from ATM Cash Van

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.