कापूस खरेदीत १४ शेतकऱ्यांची १४ लाखांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2023 10:26 PM2023-04-24T22:26:10+5:302023-04-24T22:26:42+5:30

Nagpur News कापसाला बाजारभावापेक्षा अधिक दर मिळवून देण्याची बतावणी करीत बेला (ता. उमरेड) परिसरातील १२ आणि नांद (ता. भिवापूर) परिसरातील दाेन अशा एकूण १४ शेतकऱ्यांची १४ लाख रुपयांनी फसवणूक करणाऱ्या तिघांना बेला पाेलिसांनी अटक केली आहे.

14 lakhs fraud of 14 farmers in purchase of cotton | कापूस खरेदीत १४ शेतकऱ्यांची १४ लाखांनी फसवणूक

कापूस खरेदीत १४ शेतकऱ्यांची १४ लाखांनी फसवणूक

googlenewsNext

नागपूर : कापसाला बाजारभावापेक्षा अधिक दर मिळवून देण्याची बतावणी करीत बेला (ता. उमरेड) परिसरातील १२ आणि नांद (ता. भिवापूर) परिसरातील दाेन अशा एकूण १४ शेतकऱ्यांची १४ लाख रुपयांनी फसवणूक करणाऱ्या तिघांना बेला पाेलिसांनी अटक केली आहे. फसवणूक करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यताही पाेलिसांनी व्यक्त केली आहे.

अतुल बंडू पिसे (वय ३४), दीपक शालिक चंदनखेडे (२०, दाेघेही रा. डोंगरगाव, ता. समुद्रपूर, जिल्हा वर्धा) आणि शुभम शांताराम काटवले (२५, रा. नांद, ता. भिवापूर, जिल्हा नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. यावर्षी कापसाच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहे. मागीलवर्षी कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये दर मिळाल्याने यावर्षी किमान १० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबविली आहे.

नेमकी हीच बाब हेरून या तिघांनी बेला आणि नांद परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात घेत कापसाला अधिक भाव देण्याची बतावणी केली. तिघांनीही या भागातून १४ पेक्षा अधिक शेतकऱ्यांकडील कापूस उधारीत खरेदी केला आणि ताे हिंगणघाट, जिल्हा वर्धा येथील तीन जिनिंग-प्रेसिंगमध्ये विकला. जिनिंग-प्रेसिंग मालकांकडून रकमेची उचल केली. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे न देता त्यांची फसवणूक केली. त्यामुळे प्रकरण पाेलिसात गेले. याप्रकरणी बेला पाेलिसांनी भादंवि ४२०, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून तिघांना अटक केली. न्यायालयाने तिन्ही आराेपींना पाेलिस काेठडी सुनावल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

ते चेक कुणाचे?

आराेपींनी शेतकऱ्यांना चुकाऱ्यापाेटी चेक दिले. मात्र, ते चेक आराेपींपैकी कुणाचेही नसून, दुसऱ्या कुणाच्या नावे असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली असून, पाेलिस त्याचाही तपास करीत आहेत. आराेपींनी कापूस विकण्यासाठी जिनिंग मालकांकडे शेतकऱ्यांचे सात-बारा सादर केल्याचे तक्रारीत नमूद आहे. ही खासगी खरेदी असल्याने सात-बारा देण्याचे काेणतेही कारण नव्हते, असेही व्यक्तींनी सांगितले. या प्रकरणात आराेपी आणि फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पाेलिस कर्मचाऱ्याचे उखळ पांढरे

आराेपी अतुल पिसे हा मध्यंतरी नांद येथे वास्तव्याला हाेता. याच काळात ताे नांद पाेलिस चाैकीतील काही पाेलिस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला आणि एकाशी त्याची घट्ट मैत्री झाली. त्याने नांद परिसरातील काही शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून त्यांची फसवणूक केली. शेतकऱ्यांनी याबाबत पाेलिसांकडे तक्रार केली. मात्र, एका पाेलिस कर्मचाऱ्याने या प्रकरणात गुन्हा दाखल न करता आराेपी अतुलची पाठराखण केली. या बदल्यात अतुलने त्या कर्मचाऱ्याला चारचाकी वाहन भेट दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: 14 lakhs fraud of 14 farmers in purchase of cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस