१४ महिने लोटले, आणखी किती काळ स्कूल बसची चाके थांबलेली राहणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:08 AM2021-05-19T04:08:09+5:302021-05-19T04:08:09+5:30

- कोरोना अन् टाळेबंदीने हिरावला चालकांचा रोजगार : फायनान्स कंपन्यांचा हप्ता, बँकेच्या किश्ती भरायच्या कशा? - उदरनिर्वाहासाठी कुणी विकतोय ...

14 months have passed, how much longer will the wheels of the school bus stop? | १४ महिने लोटले, आणखी किती काळ स्कूल बसची चाके थांबलेली राहणार?

१४ महिने लोटले, आणखी किती काळ स्कूल बसची चाके थांबलेली राहणार?

Next

- कोरोना अन् टाळेबंदीने हिरावला चालकांचा रोजगार : फायनान्स कंपन्यांचा हप्ता, बँकेच्या किश्ती भरायच्या कशा?

- उदरनिर्वाहासाठी कुणी विकतोय भाजी तर कुणी थाटली फुटपाथवर कपडे, क्रॉकरी अन् होम डेकोरेशनची दुकाने

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भविष्याचे वाहक म्हणून तर कुणाला म्हणावे लागेल तर वर्तमानकाळात ही बिरुदावली स्कूल बस, व्हॅन चालकांना द्यावी लागेल. मुलांना शाळेपर्यंत पोहोचवणे आणि शाळेतून घरी सोडण्याची जबाबदारी हे लोक इमाने इतबारे पार पाडतात आणि मिळालेल्या उत्पन्नातून स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. स्कूल बस, व्हॅनच्या भरवशावर अनेकांना हक्काचा रोजगार मिळाला तर अनेकांनी या स्वयंप्रेरित व्यवसायात हात आजमावला आणि प्रगती साधली. याच व्यवसायाच्या भरवशावर एकाचे दोन आणि दोनाचे चार वाहने खरेदी केली आणि बेरोजगारांना रोजगार देण्यात योगदान दिले. मात्र, देशावर झालेले कोरोनाचे आक्रमण आणि त्यायोगे लागू झालेल्या टाळेबंदीने गेल्या १४ महिन्यांपासून स्कूल बस, व्हॅन चालक व मालक दोघेही हतबल झाले आहेत. कर्जावर वाहन घेतल्याने फायनान्स कंपन्यांचे हप्ते इच्छा नसतानाही थकले आहेत. उत्पन्नाची दारे अर्थात शाळाच लॉकडाऊन असल्याने हप्ते फेडायचे कसे, हा प्रश्न आहे. फायनान्स कंपन्या, बँकांना या संकटाचे काहीच सोयरसुतक नाही आणि शासनही स्वयंरोजगारित असलेल्या स्कूल बस, व्हॅन चालकांबाबत गंभीर नाही. हे असे असताना दैनिक जीवनयापनासाठी पैसा तर लागतोच. त्यासाठी अनेकांनी आपल्या स्कूल बस, व्हॅनवरच भाजीची, कपड्याची, क्रॉकरीची, होम डेकोरची दुकाने थाटली आहेत. मात्र, त्यावरही निर्बंध असल्याने कसे बसे घर चालविण्याचा मार्गही कुंठित झाला आहे.

-----------------------

पॉईंटर्स

(ही आकडेवारी आरटीओ नागपूरकडे ३१ जानेवारी २०२१ पर्यंत झालेल्या नोंदीनुसार आहे. )

स्कूल बस/व्हॅन (१२ आसनी) - १९३१

स्कूल बसेस (१२ आसनाच्या वर) - ६६५

स्कूल व्हॅन चालक - ८ हजार

स्कूल बसचालक - ३ हजार

स्कूल बस, व्हॅनने प्रवास करणारी मुले - २ लाखाच्या वर

-----------------

एमएसएमई योजना आमच्यासाठी नाहीत का?

गेल्या १४ महिन्यांपासून स्कूल बस, व्हॅनची चाके बंद आहेत आणि आमचे आर्थिक स्त्रोत बाधित झाले. त्यावर पर्याय म्हणून स्वत:चा गृहउद्योग सुरू केला. बँकांकडे एमएसएमई योजनेसाठी आवेदने दिली. मात्र, वारंवार विनंती अर्ज फेटाळले जात आहेत. एकीकडे आत्मनिर्भर भारताचा गाजावाजा केला जात आहे आणि दुसरीकडे बँकांकडून हरताळ फासला जात आहे. मग, व्हॅनचालकांनी जगायचे कसे, हा प्रश्न आहे.

- नितीन पात्रीकर, स्कूल बस-व्हॅन चालक ()

----------------

मानसिक दडपणामुळे चुकीचे निर्णय घेण्याची भीती

वाहनाची चाके जागच्या जागी थबकली आहेत. जगायचे कसे, हा प्रश्न कठीण झाला आहे. एक सहकारी व त्याचे कुटुंब दोन दिवस उपाशी असल्याचे कळल्यावर आम्हीच त्याला आधार देऊ केला. मात्र, हे जास्त काळ शक्य नाही. कुटुंब चालवण्याच्या तणावामुळे कोणी चुकीचे पाऊल उचलण्याची भीती वाटत आहे.

- श्यामसुंदर सोनटक्के, स्कूल बस-व्हॅन चालक ()

------------------

शासनदरबारी आम्ही इतके दुर्लक्षित का आहोत?

टाळेबंदीत शासनाने अनेक क्षेत्रातील लोकांना आधार दिला. मात्र, आमच्याकडे लक्ष नाही. आम्ही खरेच का इतके दुर्लक्षित आहोत. इतरांना मदत दिली ती योग्य. आम्हालाही सरकारने सहकार्य करावे. व्हॅन चालक दरवर्षी शासनाला टॅक्स, इन्शुरन्स, पासिंग, फिटनेसच्या माध्यमातून ४० हजार रुपये देत असतात. मात्र, आमच्या अडतीला शासन काहीच का देत नाही.

- रवींद्र देवपुजारी, स्कूल व्हॅन चालक ()

------------------

शंभरावर निवेदने दिली, उत्तर मिळाले नाही

स्कूल बस-व्हॅन चालकांच्या स्थितीबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्री ते मनपा आयुक्तांपर्यंत शंभराच्या वर निवेदने देऊन झाली. मात्र, कुणाकडूनच उत्तरे मिळाली नाही. उद्या आम्ही आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा का, असा सवाल आहे. देशाच्या आर्थिक व्यवस्थेला इमानेइतबारे बळकट करणारा आमचा प्रामाणिक वर्ग आहे. मात्र, सरकारी मदत चोरांना दिली जात असल्याचे दिसून येते. शासनाने आपले डोके ठिकाणावर आणण्याची गरज आहे.

- चंद्रकांत जंगले, स्कूल बस-व्हॅन चालक ()

-----------------

स्कूल बस-व्हॅनचालकांच्या मागण्या

* या काळात शासनाने प्रत्येक चालकाला १० हजार रुपये मदत द्यावी.

* बँक, फायनान्स कंपन्यांनी शाळा सुरू होईस्तोवर कर्जाचे हप्ते मागू नये.

* कर्ज देऊन कर्जबाजारी न करता आर्थिक पॅकेज जाहीर करा.

* वाहन कर्जावरील व्याज माफ करा.

* शाळांनी आमचे शिल्लक राहिलेले पेमेंट द्यावे आणि एमएसएमई अंतर्गत सवलत द्यावी.

--------------

३१ मे रोजी आंदोलनाचा इशारा

स्कूल बस-व्हॅन चालकांनी सरकारकडे निवेदने दिली. मात्र, प्रतिसाद मिळालेला नाही. या विरोधात शहरात ३१ मे रोजी आंदोलनाचा इशारा स्कूल बस-व्हॅन चालकांनी दिला आहे.

.................

Web Title: 14 months have passed, how much longer will the wheels of the school bus stop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.