अडकलेल्या १४ जणांना सुखरूप काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:14 PM2019-07-31T23:14:52+5:302019-07-31T23:27:32+5:30
उमरेड तालुक्यातील पिपळा (बेला) येथे माय डेअरी कंपनीच्या सभोवताल पाणी साचले होते. या कंपनीच्या इमारतीत मंगळवारपासून अडकलेल्या १४ कर्मचाऱ्यांना बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सुखरूप बाहेर काढण्यात आले. यापैकी नऊ जण कठीण परिस्थितीत होते. सोबतच याठिकाणी अडकलेली ३०० जनावरेही आता सुरक्षित आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (उमरेड) : उमरेड तालुक्यातील पिपळा (बेला) येथे माय डेअरी कंपनीच्या सभोवताल पाणी साचले होते. या कंपनीच्या इमारतीत मंगळवारपासून अडकलेल्या १४ कर्मचाऱ्यांना बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सुखरूप बाहेर काढण्यात आले. यापैकी नऊ जण कठीण परिस्थितीत होते. सोबतच याठिकाणी अडकलेली ३०० जनावरेही आता सुरक्षित आहेत. जनावरे सुरक्षित असली तरी संकटातून बाहेर पडलेल्या नाही. पाऊस अधिक वाढला तर तशीच पूर्ववत परिस्थिती होऊ शकते आणि जनावरांना धोका होऊ शकतो. नागपूर येथील ‘एसडीआरएफ’ या २२ जणांच्या चमूने हे ऑपरेशन फत्ते करीत दिलासा दिला. सुखरूप काढण्यात आलेल्यांमध्ये भारती बडोले ही गर्भवती महिला तसेच किट्टू बडोले या साडेतीन वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.
बेलानजीकच्या पिपळा येथे माय डेअरी या कंपनीचे उत्पादन चालते. याठिकाणी ३०० जनावरे आहेत; शिवाय ८८ च्या आसपास कर्मचारी कर्तव्यावर आहेत. ३० जुलै रोजी संततधार पावसामुळे काही कर्मचारी कंपनीत गेले नाही. केवळ १४ कर्मचारी कंपनीत पोहोचले. अशातच कंपनीच्या सभोवताल पाणी वाढल्याने या ठिकाणी १४ कर्मचारी अडकले.
कंपनीच्या इमारतीत जनावरांसाठी शेड तयार करण्यात आलेले आहे. त्या शेडवर चढून आम्ही आपला जीव मुठीत ठेवून होतो. रात्रभर पाऊस वाढू नये, अशी प्रार्थना आम्ही करीत होतो, अशी कैफियत या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. अखेरीस नागपूर येथून एसडीआरएफ या रेस्क्यू ऑपरेशनच्या चमूस पाचारण केल्या गेले. बोट घटनास्थळाकडे नेण्यास अडचण निर्माण झाली असताना, कसेबसे ट्रॅक्टरवरून बोट घटनास्थळाकडे नेण्यात आल्या. सकाळी ७ वाजतापासून या चमूने सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. सातत्याने तीन तास परिश्रम घेत १४ जणांना सुखरूप बाहेर काढले.
घनश्याम वाणी, मंगेश टिपले, विनायक काकडे, शांताराम चुटे, मनोहर चुटे, रजत सहारे, जगदीश जंगम, उमेश तिडगाम, धनराज मांडवसकर, विकास बडोले, अमोल नांदूरकर, किट्टू बडोले, भारती बडोले आणि कुंदा नांदूरकर यांचा अडकलेल्यांमध्ये समावेश आहे. सदर कामगिरी एसडीआरएफचे पोलीस निरीक्षक प्रमोद लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे यांच्या नेतृत्वात यशस्वीरीत्या पार पडली.
सारेच गहीवरले
विशेषत: या कंपनीत जनावरांसाठी टिनाचे शेड तयार करण्यात आले आहेत. हळुहळू पाणी वाढत गेल्याने आता आपल्या जीवास धोका होऊ शकतो, ही बाब लक्षात येताच अडकलेल्या १४ जणांनी जनावरांच्या शेडवर रात्री मुक्काम ठोकला. जनावरांच्या मानेपर्यंत पाणी होते. अन्न-पाण्यावाचून या सर्वांनी कशीबशी रात्र काढली. सकाळीच १०.३० वाजताच्या सुमारास सर्वांची सुखरूप सुटका झाल्यावर सारेच गहिवरले. सर्वांनी एसडीआरएफच्या चमूचे आभार मानले.