१३ वर्षीय मुलावर वर्गमित्राकडून चाकूने वार; नागपूरच्या सेंटर पाॅईंट शाळेतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2022 02:43 PM2022-07-01T14:43:26+5:302022-07-01T16:05:03+5:30
दोन्ही मुले एकाच वर्गातील आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते मैदानावर सुटीच्या वेळी खेळत असताना काही किरकोळ कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर एका मुलाने त्याच्या वर्गमित्रावर स्विस चाकूने वार केले.
नागपूर : दाभा येथील सेंटर पाॅईंट शाळेत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्याच्या वर्गमित्रावर चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. ही घटना बुधवारी शाळा परिसरातच घडली. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.
घटनेचा तपास गिट्टीखदान पोलीस करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना शाळेच्या मैदानात घडली असून कोणत्याही पक्षाने तक्रार दाखल केली नसली तरी त्याचा तपास करण्यात येत आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय बापू ढेरे यांनी सांगितले, दोन्ही मुले एकाच वर्गातील आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते मैदानावर सुटीच्या वेळी खेळत असताना काही किरकोळ कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर एका मुलाने त्याच्या वर्गमित्रावर स्विस चाकूने वार केले.
शिक्षकांनी जखमी विद्यार्थ्याला खासगी रुग्णालयात नेले. त्याच्या पालकांना कळविल्यावर त्यांनीही हॉस्पिटल गाठले. सुदैवाने मुलाला गंभीर दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन कसाड यांनी हा विषय गंभीर असल्याने आम्ही हल्ला करणाऱ्या मुलाला तात्पुरते निलंबित केले असल्याचे सांगितले. रुग्णालयामार्फत मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याची माहिती सांगण्यात येत आहे.