नागपूरच्या बिशप कॉटन स्कूलमध्ये १.४० कोटीचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:18 PM2018-11-28T22:18:10+5:302018-11-28T22:19:16+5:30
बोगस दस्तावेजाच्या मदतीने सदर येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये १ कोटी ४० लाखाचा अपहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बोगस दस्तावेजाच्या मदतीने सदर येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये १ कोटी ४० लाखाचा अपहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या सेवानिवृत्त प्राचार्या मंगला सॅम्युअल भालेराव, त्यांचे पती सॅम्युअल भालेराव आणि मुलगी तनुश्री भालेराव, रा. उमाशंकर अपार्टमेंट गाकुलपेठ अशी आरोपींची नावे आहेत.
मंगला भालेराव या बिशप कॉटन स्कूलमध्ये २००५ ते २०१७ या दरम्यान प्राचार्य होत्या. असे सांगितले जाते की, २०१५ मध्ये त्या ५८ वर्षाच्या झाल्या होत्या. त्यानुसार त्या सेवानिवृत्त होणार होत्या. परंतु त्यांनी बोगस दस्तावेजाच्या आधारावर आपले वय कमी दाखविले. त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीला २०१७ पर्यंत वाढ मिळाली. मंगला भालेराव यांची मुलगी तनुश्री भालेराव ही सुद्धा बिशप कॉटन स्कूलमध्ये कार्यरत आहे. मंगलाने मुलगी तनुश्री आणि पतीच्या मदतीने विद्यार्थ्यांकडून एकत्र केलेल्या निधीमध्ये हेराफेरी केली. मुलगी आणि पतीच्या मदतीने बोगस दस्तावेज तयार करून शाळेच्या निधीचे १ कोटी ४० लाख ७५ हजार २९७ रुपयाचा अपहार केला. आपल्या कृत्यावर पडदा टाकण्यासाठी त्यांनी मुलीकडेच आपला प्रभार सोपविला.
सूत्रानुसार एक वर्षापूर्वी हे प्रकरण समोर आले होते. सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सीताबर्डीचे तत्कालीन दुय्यम निरीक्षक अनिल वर्टीकर यांनी याचा तपास सुरू केला. नंतर वर्टीकर यांची बदली झाल्यावर एस.एस. परमार हे या प्रकरणाचा तपास करीत होते.
सूत्रानुसार या प्रकरणात पोलिसांची भूमिका अतिशय संथ तपासाची होती. त्यामुळे न्यायालयात दाद मागण्यात आली. न्यायालयाने या प्रकरणाला गांभीर्याने घेतले. यानंतर पोलिसांनाही जाग आली. पोलिसांनी प्रकरण अंगावर उलटेल या भीतीने मंगळवारी भालेराव परिवाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. परंतु कुणालाही अटक केली नाही. यावर पोलीस काहीही बोलायला तयार नाही.
शाळेच्या प्रतिष्ठेला धक्का
बिशप कॉटन स्कूल शहरातील सर्वात जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. ही शाळा खूप प्रसिद्ध आहे. अतिशय प्रतिभावंत विद्यार्थी येथे घडलेत. या प्रकरणामुळे शाळेच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचला आहे. शाळेतील काही लोकांचेही आरोपींना संरक्षण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.