नागपुरात १.४० लाखाचा बनावट खाद्यतेलाचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 08:34 PM2020-07-16T20:34:13+5:302020-07-16T20:35:33+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाने खाद्यतेल विक्रेत्यावर टाकलेल्या धाडीत १.४० लाख रुपये किमतीचा बनावट खाद्यतेलाचा साठा जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने खाद्यतेल विक्रेत्यावर टाकलेल्या धाडीत १.४० लाख रुपये किमतीचा बनावट खाद्यतेलाचा साठा जप्त केला.
माहितीच्या आधारे विभागाने १५ जुलैला तेलीपुरा, नेहरू पुतळा, इतवारी येथील शंकर ट्रेडिंग कंपनीवर धाड टाकून पेढीचे मालक शंकर विनायक दुरुगकर हे रिफाईन्ड सोयाबीन खाद्यतेलाचा पुनर्वापर केलेल्या १५ किलो व लिटरच्या टिनमध्ये रिपॅकिंग करून टिनला फॉर्च्युन, किंग्ज या नामांकित कंपन्यांच्या कंपनीचे बनावट लेबल व टिकली लावून टिन सीलबंद करून तेलाची विक्री करीत असल्याचे व ग्राहकांची फसवणूक करीत असल्याचे आढळून आले.
पेढीकडून रिफाईन्ड सोयाबीन तेल (फॉर्च्युन) १९३.४ लिटर (किंमत १७,१६४ रुपये), किंग्ज ब्रॅण्ड ११५३.४ किलो (किंमत ९५,१५५ रुपये) व खुले तेल ३५८.४ किलो (किंमत २७,३२८ रुपये) असा एकूण १,३९,६४७ रुपये किमतीचा साठा जप्त केला. साठ्यातून प्रत्येकी एक-एक नमुने विश्लेषणासाठी घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविल्यात आले आहेत. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व माणके कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न) अभय देशपांडे यांच्या नेतृत्वात कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी प्रफुल्ल टोपले आणि विनोद धवड यांनी केली.
पुढील सणासुदीच्या दिवसात खाद्यपदार्थांमध्ये भेसळीची जास्त शक्यता असल्याने विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. ग्राहकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास त्याबाबत प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन सहआयुक्त चंद्रकांत पवार यांनी केले आहे.