मॉस्कोवरून नागपुरात येताहेत १४० प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:39 PM2020-06-16T23:39:46+5:302020-06-16T23:42:17+5:30
वंदे भारत अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत आज रात्री रूसची राजधानी मॉस्को येथून १४० भारतीयांना नागपूरला आणले जात आहे. एअर इंडियाची ही फ्लाईट आज रात्री १२.१५ वाजता नागपूरला पोहचणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वंदे भारत अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत आज रात्री रूसची राजधानी मॉस्को येथून १४० भारतीयांना नागपूरला आणले जात आहे. एअर इंडियाची ही फ्लाईट आज रात्री १२.१५ वाजता नागपूरला पोहचणार आहे.
एअर इंडियाच्या अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्को येथून फ्लाइट एआय १९२४ मंगळवारी आणि बुधवारच्या दरम्यान रात्री मास्कोवरून दिल्लीला पोहचेल. नंतर दिल्लीवरून नागपूरला रात्री १२.१५ वाजता पोहचेल. नागपूर एअरपोर्टवर पोहचल्यावर निश्चित करण्यात आलेल्या गाईडलाईननुसार, प्रवाशांकडून सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरून घेतले जातील. हातावर १४ दिवस क्वारंटाईन स्टॅम्प लावले जातील. या सर्व प्रक्रियेनंतरच त्यांना टर्मिनल बिल्डिंगच्या बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल.
जगभरात कोविड-१९ च्या महामारीमुळे लॉकडाऊन सुरू आहे. उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. अद्यापही विदेशामध्ये अनेक भारतीय अडकलेले आहेत. भारत सरकार ‘वंदे भारत अभियान’ अंतर्गत या नागरिकांना भारतामध्ये परत आणण्याची प्रक्रिया करत आहे. मॉस्कोवरून नागपूरला येणारी फ्लाइट प्रवाशांना उतरविल्यावर बुधवार व गुरुवारच्या दरम्यान रात्री १ वाजता दिल्लीकडे रवाना होईल. दिल्लीमध्ये या विमानाला मशीनच्या साहाय्याने सॅनिटायझेशन केले जाईल.