पोलीस कारागृह भरतीच्या ६०२ जागांसाठी ८५ हजार २८४ अर्ज 

By योगेश पांडे | Published: June 17, 2024 10:53 PM2024-06-17T22:53:19+5:302024-06-17T22:53:37+5:30

नागपूर पोलीस मुख्यालयातर्फे पोलीस शिपायांच्या ३४७ व कारागृह विभागाच्या २५५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

141 applications for one post of police-jail recruitment | पोलीस कारागृह भरतीच्या ६०२ जागांसाठी ८५ हजार २८४ अर्ज 

पोलीस कारागृह भरतीच्या ६०२ जागांसाठी ८५ हजार २८४ अर्ज 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : २०२२-२३ च्या पोलीस व कारागृह विभागाच्या भरती प्रकियेतील शारीरिक चाचणीला १९ जूनपासून सुरुवात होणार आहे. या दोन्ही विभागांच्या ६०२ जागांसाठी एकूण ८५ हजार २८४ अर्ज आले आहेत. सरासरी एका जागेमागे १४१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनी पत्रपरिषदेत सोमवारी ही माहिती दिली.

नागपूर पोलीस मुख्यालयातर्फे पोलीस शिपायांच्या ३४७ व कारागृह विभागाच्य २५५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलीस शिपाईपदांसाठी एकूण २९ हजार ९८७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात ७ हजार ७१३ महिला व पाच तृतीयपंथींयांचा समावेश आहे. तर कारागृहातील भरतीसाठी ५५ हजार २९७ अर्ज मिळाले असून त्यात १५ हजार ६१८ महिला व पाच तृतीयपंथी आहेत.

पोलीस शिपाई, चालक,सशस्त्र पोलिस शिपाई, कारागृह विभाग शिपाई पदासाठी बुधवार १९ जून पासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पोलिस मुख्यालयात शारीरिक चाचणी होणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक राबविली जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे व गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील हे निवड मंडळाचे अध्यक्ष आहेत. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रात शारीरिक चाचणी घेण्यात येईल. मुख्यतः चाचणीचा वेळ हा सकाळचा असून सकाळी ९ वाजता पर्यंत शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर उन्हाची दाहकता पाहून साधारण ५ वाजता उर्वरित उमेदवारांची चाचणी घेण्यात येईल. वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू भरती वेळेस तैनात राहणार आहेत, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

अफवांवर विश्वास नको
भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना काही शंका किंवा तक्रारी असल्यास त्यांच्यासाठी तक्रारपेटी ठेवल्या जाईल. यात उमेदवार न घाबरता तक्रार करू शकतात. त्यामुळे उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.
 

Web Title: 141 applications for one post of police-jail recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस