म्युकरमायकोसिसचे पूर्व विदर्भात १४४१ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:07 AM2021-06-05T04:07:21+5:302021-06-05T04:07:21+5:30
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिसचा धोका वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. मागील दोन महिन्यात पूर्व विदर्भात १४४१ ...
नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना म्युकरमायकोसिसचा धोका वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. मागील दोन महिन्यात पूर्व विदर्भात १४४१ रुग्ण व १२० मृत्यूची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहेत. १२१० रुग्ण व १११ मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. नागपूरनंतर वर्धा जिल्ह्यात ९१ रुग्ण, ३ मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यात ८६ रुग्ण, २ मृत्यू, गोंदिया जिल्ह्यात ४१ रुग्ण, ४ मृत्यू, भंडारा जिल्ह्यात १३ रुग्ण तर गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही.
म्युकरमायकोसिसच्या वाढत्या धोक्याविषयी आरोग्य विभागाने गंभीर इशारा दिला आहे. मधुमेह असलेल्या किंवा कोरोनाच्या उपचारादरम्यान मधुमेह झालेल्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रक्तातील साखरेचे योग्य व्यवस्थापन आणि काळजी घेतल्यास म्युकरमायकोसिसच्या धोक्याला दूर ठेवता येऊ शकते. म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नसला तरी त्याची भीती वाढत असल्याचे पूर्व विदर्भातील चित्र आहे.
- नागपुरात ८९९ रुग्णांवर शस्त्रक्रिया
नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत १२१० रुग्ण आढळून आले असून, सध्याच्या स्थितीत ५२३ रुग्ण अॅक्टिव्ह म्हणजे शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचाराखाली आहेत. १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ८९९ रुग्णांवर शस्त्रक्रिया होऊन ५७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
- वर्धेत ६७ रुग्ण अॅक्टिव्ह
वर्धा जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या ९१ रुग्णांची नोंद झाली असून, ३ रुग्णांचा जीव गेला आहे. सध्या ६७ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. ५० रुग्णांवर शस्त्रक्रिया तर, २४ रुग्ण बरे झाले आहेत.
- चंद्रपूरमध्ये ४४ रुग्णांवर शस्त्रक्रिया
चंद्रपूर जिल्ह्यात ८६ रुग्ण आढळून आले आहेत तर, २ रुग्णांचा बळी गेला आहे. सध्या ५१ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील ४४ रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली असून, ३३ रुग्ण बरे झाले आहेत.
जिल्हा: रुग्ण : मृत्यू
नागपूर : १२१० : १११
वर्धा : ९१ : ०३
चंद्रपूर : ८६ : ०२
गोंदिया : ४१ : ०४
भंडारा: १३ :००
गडचिरोली :०० :००