गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
By मोरेश्वर मानापुरे | Published: May 30, 2024 10:08 PM2024-05-30T22:08:01+5:302024-05-30T22:08:36+5:30
- घोटाळ्यांची संख्या ३.४६ लाखांवर
नागपूर : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली असलेल्या राष्ट्रीयकृत, खासगी आणि अन्य बँकांमध्ये गत आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १४ हजार ५९६ कोटी रुपयांचे ३,४६,०५९ आर्थिक घोटाळे उघडकीस आल्याचे धक्कादायक वृत्त आहे. हे घोटाळे ६३ नामांकित बँकांमध्ये झाले आहेत. या घोटाळ्यांमध्ये केवळ ७५३.८९ कोटी रुपये वसूल झाले आहेत.
ही माहिती माहितीच्या अधिकारांतर्गत उघड झाली आहे. आयटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी उपरोक्त माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेकडे मागितली. त्यांनी मागितलेल्या काही प्रश्नांची उत्तरे रिझर्व्ह बँकेने दिली नाहीत. रिझर्व्ह बँकेने देशातील एकूण ६३ बँकांमध्ये किती कोटींचे घोटाळे झाले, घोटाळ्यांची संख्या आणि वसूल रक्कमेची माहिती बँकवार दिली आहे.
बँकांमध्ये सायबर फसवणूक किती झाली, याची परिपूर्ण माहिती रिझर्व्ह बँकेने दिली नाही. परंतु बँकांनी आर्थिक वर्ष-२०२३ मध्ये कार्ड ऑपरेशन परिसर अथवा इंटरनेट या हेडखाली २,९३,४८७ जणांची २,०६६ कोटींची फसवणूक झाली आणि त्यापैकी केवळ १५१.८५ कोटी रुपये वसूल झाल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
बँकांमध्ये दावा न केलेल्या किती कोटींच्या ठेवी आहेत, याची माहिती उत्तरात दिली नाही. परंतु ही माहिती रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे म्हटले आहे.
आर्थिक घोटाळ्यात कर्मचाऱ्यांचाच जास्त समावेश
एका प्रश्नाच्या उत्तरात रिझर्व्ह बँकेने शेड्युल व्यावसायिक बँकांमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्यांमध्ये वर्ष-२०२१ मध्ये १४,९०,९३९, वर्ष-२०२२ मध्ये १५,३०,८१० आणि वर्ष-२०२३ मध्ये १६,७९,०५५ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. ३१ मार्च २०२४ पर्यंतची माहिती उपलब्ध नसल्याचे अभय कोलारकर यांना दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेने बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, १९४९ आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अॅक्ट, १९३४ नुसार आर्थिक वर्ष-२०१७ ते एप्रिल-२०२४ पर्यंत विविध एनबीएफसी, सीआयसी, एचएफसी यांच्याकडून आर्थिक दंड वसूल केल्याचे उत्तरात म्हटले आहे.