नागपूर लोकसभा मतदारसंघात १५ टक्के उमेदवार कोट्यधीश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:39 AM2019-03-27T10:39:06+5:302019-03-27T10:42:59+5:30
देशातील अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये कोट्यधीश व बाहुबली उमेदवारांचीच भाऊगर्दी दिसून येते. मात्र नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य उमेदवारांची संख्या जास्त दिसून येत आहे.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये कोट्यधीश व बाहुबली उमेदवारांचीच भाऊगर्दी दिसून येते. मात्र नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य उमेदवारांची संख्या जास्त दिसून येत आहे. मतदारसंघातून सद्यस्थितीत ३३ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी केवळ १५ टक्के उमेदवारच कोट्यधीश आहेत.
निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या मालमत्तेचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. सर्वच पक्ष व अपक्ष मिळून एकूण नागपूर लोकसभा मतदारसंघात ३३ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण उमेदवारांच्या संख्येच्या तुलनेत टक्केवारी काढली असता निवडणुकांत पाच म्हणजेच १५ टक्के उमेदवारांची संपत्ती कोटींमध्ये आहे. उमेदवार तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या स्थावर व जंगम मालमत्ता विचारात घेऊन एकूण मालमत्ता दर्शविण्यात येते हे विशेष. नागपूर मतदारसंघातील १८ टक्के उमेदवारांची एकूण मालमत्ता ही एक लाखांहून कमी आहे. तर २१ टक्के उमेदवारांची मालमत्ता १ लाख ते १० लाख यांच्या दरम्यान आहे. १५ टक्के उमेदवारांकडील एकूण मालमत्ता १० लाख ते २५ लाख यांच्या दरम्यान आहे. ९ टक्के उमेदवारांची मालमत्ता २५ लाख ते ५० लाख तर १२ टक्के उमेदवारांची मालमत्ता ५० लाख ते १ कोटींच्या दरम्यान आहे. सर्वाधिक कोट्यधीश हे नोंदणीकृत पक्षांमध्ये असून अवघा एक अपक्ष कोट्यधीश आहे. तीन उमेदवारांनी त्यांच्या नावावर कुठलीही मालमत्ता नसल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.
२४ टक्के उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न एक लाखांच्या आत
तब्बल २४ टक्के उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख किंवा त्याहून कमी आहे. १२ टक्के उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न हे २७ हजार किंवा त्याहून कमी असून ते ‘बीपीएल’ गटात मोडत आहेत. ३३ पैकी ८ जणांनी त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न निरंक असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.
न्यायालयीन खटले सुरू
निवडणुकीला उभे असलेल्यांपैकी चार उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून न्यायालयीन खटले सुरू आहेत. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या एकूण खटल्यांची संख्या ही १२ इतकी आहे. यातील एक तृतीयांशहून अधिक गुन्हे हे राजकीय आंदोलनांशी संबंधित आहेत. एकाही उमेदवाराचा दोष सिद्ध झालेला नाही.