ग्राहकांचे १.५ कोटीही ‘गोम्स’ने केले हडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:39 PM2019-02-20T23:39:22+5:302019-02-20T23:41:00+5:30
पोर्ट ओ गोमेज रेस्टॉरंटचे संचालक आल्विन गोम्सने ग्राहकांकडून वसूल करण्यात आलेले दीड कोटी रुपयेसुद्धा हजम केल्याचे उघडकीस आले आहे. परंतु पोलिसांनी विचारपूस केली असता गोम्सने हा आरोप नाकारला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोर्ट ओ गोमेज रेस्टॉरंटचे संचालक आल्विन गोम्सने ग्राहकांकडून वसूल करण्यात आलेले दीड कोटी रुपयेसुद्धा हजम केल्याचे उघडकीस आले आहे. परंतु पोलिसांनी विचारपूस केली असता गोम्सने हा आरोप नाकारला आहे.
धंतोली पोलिसांनी १८ फेब्रुवारी रोजी रात्री गोम्स विरुद्ध भागीदारांची १.३५ कोटी रुपयाने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सीए शोमित बागची, सरोज हेडा आणि पंकज राठी यांच्यासह मिळून गोम्सने रेस्टॉरंट सुरू करण्याचा करार केला होता. चौघांनी गोम्स फूड आर्ट प्रा. लि. नावाने कंपनी सुरू केली होती. या कंपनीच्या नावाने शंकरनगरात पोर्ट ओ गोमेज रेस्टॉरंट सुरू करण्यात आले होते. पोलीस सूत्रानुसार बागची, हेडा आणि राठी यांनी या व्यवसायात पाच कोटी रुपयापेक्षा अधिक रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांनी बँकेतून कर्जही घेतले होते. हॉटेल व्यवसायात अनुभव असल्याने गोम्सला रेस्टॉरंटच्या संचालनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गोम्स सुरुवातीपासूनच बागची आणि साथीदारांना रेस्टॉरंट तोट्यात चालत असल्याचे सांगत होता. बागचीने त्याला रेस्टॉरंट बंद करायला सांगितले. त्यावर गोम्स गप्प बसला. यानंतर बागची व त्यांच्या साथीदारांना संशय आला. त्यांनी आपल्या पद्धतीने चौकशी केली असता गोम्सने गोमेज बिज नावाच्या कंपनीचे खाते उघडून त्यात ग्राहकांकडून येणाऱ्या ई-पेमेंटच्या माध्यमातून १ कोटी ३५ लाख रुपये जमा केल्याचे उघडकीस आले. त्याचप्रकारे ग्राहकांकडून वसूल करण्यात आलेल्या रोख रकमेचाही गोम्सकडे कुठलाही हिशेब नव्हता. त्याने तीन वर्षात रोख वसूल केलेले जवळपास दीड कोटी रुपये हजम केल्याची बाब उघडकीस आल्याने बागचीला धक्काच बसला.
गोम्सने कंपनीच्या खात्याऐवजी स्वत:च्या खात्यात पैसे जमा केल्याने त्याने आपली फसवणूक केल्याची बाब उघड झाली. बागचीने धंतोली पोलिसात तक्रार दाखल केल्यावर गोम्सने त्याला समझोता करण्यासाठी १५ दिवसाची मुदत मागितली. याच दरम्यान त्याने बागची आणि त्याच्या साथीदाराची आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली. यानंतर आर्थिक शाखेचे पोलीस बागची आणि त्याच्या साथीदारामागे लागले. दरम्यान धंतोली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून गोम्सला अटक केली.
सूत्रानुसार रेस्टॉरंटवर कब्जा करण्याची गोम्सची योजना होती. तो पूर्वी सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये काम करीत होता. यादरम्यान त्याची बागचीसोबत ओळख झाली. असे सांगितले जाते की, गोम्स अतिशय महत्त्वाकांक्षी आणि तरबेज आहे. त्याला शहरातील अनेक चर्चित लोकांचे समर्थन मिळालेले होते. त्यांच्या माध्यमातून त्याची रेस्टॉरंटवर कब्जा करण्याची योजना होती. याची माहिती होताच बागची आणि त्याचे साथीदार सतर्क झाले. गोम्सला २१ फेब्रुवारीपर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे. विचारपूस करताना तो पोलिसांना सहकार्य करीत नसल्याचे सांगितले जाते.