बदनामीची भिती दाखवून मागीतली १५ लाख खंडणी, तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
By दयानंद पाईकराव | Published: December 31, 2023 07:38 PM2023-12-31T19:38:58+5:302023-12-31T19:39:06+5:30
बदनामी करणाऱ्या खोटया बातम्या केल्या प्रकाशित
नागपूर: बदनामीची भिती दाखवून १५ लाख रुपये खंडणी मागून ५० हजार रुपये स्वीकारल्यानंतर पुन्हा उर्वरीत रक्कमेसाठी धमकी देणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रविण भारत वाघ (रा. महावीर कॉलनी, शिवनंदनपुर, सुरजपूर, छत्तीसगड), सुरजलाल रवी (रा. पिलीशिव, मेन रोड, संरजपूर, छत्तीसगड) आणि नरेंद्र जेन (नई दुनिया) रा. मेन रोड विश्रामपूर, सुरजपूर, छत्तीसगड अशी आरोपींची नावे आहेत. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १८, सप्तक प्लाझा, नॉर्थ अंबाझरी शिवाजीनगर येथे सप्तश्री मानव नाहा (वय ४४) यांचे देवासु सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यालय आहे. ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ऑगस्ट ते सप्टेंबर २०२३ दरम्यान आरोपी प्रविणने त्यांच्या कार्यालयात जाऊन १५ लाख रुपये खंडणीची मागणी करून खंडणी न दिल्यास आरोपी सुरजला व नरेंद्र यांच्या मदतीने बदनामी करून नुकसान करण्याची धमकी दिली.
घाबरलेल्या अवस्थेतील सप्तश्री यांनी आरोपी प्रविणला ५० हजार रुपये दिले. आरोपी हे आयटीआय कार्यकर्ते असल्याचे भासवून लोकांना भिती दाखवून पैसे वसुल करीत असल्याचे सप्तश्री यांच्या लक्षात आले. सप्तश्री यांनी उर्वरीत खंडणी न दिल्यामुळे आरोपींनी संगणमत करून नई दुनिया नावाच्या वृत्तपत्रात सप्तश्री यांच्या कंपनीविरुद्ध खोटया बातम्या प्रकाशित करून खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास पुन्हा बदनामी करणाऱ्या बातम्या प्रकाशित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी सप्तश्री यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी ठाण्यात आरोपींविरुद्ध कलम ३८४, ३८५, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला आहे.