अहमदनगरातील भामट्याने हडपले १५ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:11 AM2021-08-22T04:11:51+5:302021-08-22T04:11:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - दोन भावांना वेगवेगळ्या ठिकाणी लठ्ठ पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अहमदनगर जिल्ह्यातील एका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - दोन भावांना वेगवेगळ्या ठिकाणी लठ्ठ पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अहमदनगर जिल्ह्यातील एका भामट्याने १४.५४ लाख रुपये हडपले. शुक्रवारी याप्रकरणी अजनी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
सुनील फ्रान्सिस रुपटक्के (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. तो श्रीरामपूर तालुक्यातील गावठाण हरेगाव (जि. अहमदनगर) येथील रहिवासी आहे. चंद्रमणीनगरातील हर्षल ईश्वर कोमलकर (वय ३५) याच्यासोबत त्याची तीन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. आपली अनेक नेत्यांशी ओळख असल्याची थाप मारून रुपटक्केने कोमलकरला प्रभावित केले. हर्षलने नोकरीची गोष्ट करताच, त्याने तुला गॅबरिल इंडिया लिमिटेड अंबड येथे प्रॉडक्शन मॅनेजरची आणि तुझ्या भावाला ग्रामीण रुग्णालय आणि संशोधन केंद्रात लठ्ठ पगाराची नोकरी लावून देतो, अशी थाप मारली. त्यासाठी २० जानेवारी २०१९ पासून आरोपी रुपटक्केने १४ लाख ५४ हजार रुपये कोमलकर बंधूंकडून उकळले. मात्र, तीन वर्षे होऊनही त्याने नोकरी लावून दिली नाही. त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्याने कोमलकर बंधूंनी त्याला आपली रक्कम परत मागितली असता, त्याने रक्कमही परत केली नाही. त्यामुळे हर्षल कोमलकरने अजनी ठाण्यात तक्रार नोंदविली. चाैकशी केल्यानंतर अजनी पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणात आरोपी रुपटक्केविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याची चाैकशी केली जात आहे.
----