‘पेम्फिगस’मुळे १५ टक्के मृत्यू : रज्जाक अहमद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:59 AM2018-11-25T00:59:06+5:302018-11-25T01:00:32+5:30
‘पेम्फिगस’ हा दुर्लभ त्वचा विकारांचा एक समूह आहे. जो तोंडाच्या आतपासून ते गुप्तांगसारखी त्वचा व संपूर्ण शरीरावर होतो. हा वेदनादायी व दिसायला भयानक असतो. कुठल्याही वयात हा आजार होत असलातरी मध्यम वयात हा सर्वाधिक दिसून येतो. पूर्वी या आजाराच्या रुग्णांचे १०० टक्के मृत्यू व्हायचे,परंतु आता योग्य व प्रभावी औषधोपचारामुळे हे प्रमाण १० ते १५ टक्क्यांवर आले आहे, अशी माहिती ‘सेंटर फॉर ब्लिस्टरिंग डिसीज’चे संचालक डॉ. रज्जाक अहमद यांनी येथे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘पेम्फिगस’ हा दुर्लभ त्वचा विकारांचा एक समूह आहे. जो तोंडाच्या आतपासून ते गुप्तांगसारखी त्वचा व संपूर्ण शरीरावर होतो. हा वेदनादायी व दिसायला भयानक असतो. कुठल्याही वयात हा आजार होत असलातरी मध्यम वयात हा सर्वाधिक दिसून येतो. पूर्वी या आजाराच्या रुग्णांचे १०० टक्के मृत्यू व्हायचे,परंतु आता योग्य व प्रभावी औषधोपचारामुळे हे प्रमाण १० ते १५ टक्क्यांवर आले आहे, अशी माहिती ‘सेंटर फॉर ब्लिस्टरिंग डिसीज’चे संचालक डॉ. रज्जाक अहमद यांनी येथे दिली.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी या गावात जन्मलेले डॉ. अहमद हे अमेरिकेच्या बोस्टन येथे केवळ ‘पेम्फिगस’ याच आजारावर वैद्यकीय सेवा देतात. त्यांनी या आजारावरचे जनुकदोष, प्रोटीन्स व औषधे शोधून काढल्याने जगात त्यांचा नावलौकिक आहे. महाराष्ट्र राज्य त्वचारोग, गुप्तरोग व कुष्ठरोग विशेषज्ञाची वार्षिक परिषद ‘क्युटीकॉन-२०१८’ मध्ये सहभागी झाले असताना ते ‘लोकमत’शी बोलत होते.
‘पेम्फिगस’ या आजारात रोगप्रतिकारशक्ती चुकीने ‘अँटीबॉडी’ तयार करते. जी आपली त्वचा आणि श्लेष्म पडद्यामधील निरोगी पेशींवर हल्ला करते. डॉ. अहमद यांनी या आजारावर शोधून काढलेल्या औषधोपचाराने पुन्हा आजार होत नाही. या आजारावर त्यांनी आतापर्यंत ४०० शोधनिबंध सादर केले आहे. अमेरिकेत या आजाराच्या रुग्णांची संख्या कमी आहे, परंतु भारतात मोठी संख्या आहे. यामुळे त्वचारोग तज्ज्ञाना या आजाराची व उपचाराची माहिती असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
वेळच डॉक्टर व रुग्णांकडे नाही
बदलत्या काळात सर्वच भावनिक बंध क्षीण होत आहेत. हीच गोष्ट दुर्दैवाने डॉक्टरी पेशातसुद्धा आली आहे. त्यामुळे या पेशाला विक्रता आणि ग्राहक हे स्वरूप घेऊ पाहात आहे. डॉक्टर आणि रुग्णाचा संबंध हा विश्वासावर आधारीत आहे आणि हा विश्वास रुजविण्यासाठी दोघांमध्ये वेळेची गरज आहे. परंतु ही वेळच डॉक्टर आणि रुग्णांकडे नाही. त्यामुळे वादाला तोंड फुटत आहे,असेही डॉ. अहमद म्हणाले.
परिषदेच्या आयोजनासाठी डॉ. विक्रांत सावजी, डॉ. रिझवान हक, डॉ. ई.के मुकादम, डॉ. सुधीर मामीडवार, डॉ. सुशील पांडे, डॉ. किरण गोडसे, डॉ. मनोज वाघमारे, डॉ. मोहन शेंदरे, डॉ. प्राची मत्ते, डॉ. जयंत लांजेवार, डॉ. विनोद तितरमारे, डॉ. जयेश मुखी, डॉ. नितीन बरडेआदी परिश्रम घेत आहेत.