Nagpur | मुलांच्या चोरीच्या अफवांवर पोलिसांच्या १५ पथकांचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2022 12:19 PM2022-09-26T12:19:32+5:302022-09-26T12:28:39+5:30
पोलीस त्वरित कारवाई करणार : २४ तास हेल्पलाइन राहणार; पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
नागपूर : शहरात मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या असून, नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. अशा अफवा गंभीर वळण घेऊ शकतात याची जाणीव असल्याने पोलिसांनी हा प्रकार गंभीरतेने घेतला आहे. या अफवांसंदर्भात माहिती मिळाल्यास तेथे त्वरित पोहोचण्यासाठी एकूण १५ पथके तैनात करण्यात आली आहेत.
ही पथके तातडीने घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करून योग्य ती कार्यवाही करतील. या पथकाशिवाय महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पाच टीम तयार करण्यात आल्या असून, त्या अफवांपासून नागरिकांना जागरूक करतील.
गेल्या काही दिवसांपासून मुलांचे अपहरण करून त्यांचे अवयव काढून टाकणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा पसरलेली आहे. जाफरनगर परिसरातून याची सुरुवात झाली. जरीपटका, मानकापूरसह अनेक भागात ही अफवा पसरली. शनिवारी दुपारी अपहरणाच्या अफवेने महालातही खळबळ उडाली होती. एखाद्याचे अपहरण झाले आहे की नाही याची खातरजमा न करता, लोक अफवा पसरवत असल्याचे चित्र आहे.
- गैरसमजातून ‘मॉब लिंचिंग’चा धोका
या अफवांमुळे परिसरात कामासाठी एखादा नवीन व्यक्ती आला की लोक संशयाने पाहत आहेत. गैरसमजातून ‘मॉब लिंचिंग’सारखा प्रकार घडण्याची भीतीदेखील आहे. शहरातील अनेक भागात भिक्षेकरीदेखील फिरतात. त्यांच्याबाबतदेखील गैरसमज होऊन अनुचित प्रकार घडण्याचा धोका आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असेच आवाहन करण्यात येत आहे.
-‘सोशल मीडिया’वर नको विश्वास
एका महिलेचा व्हिडिओ ‘व्हायरल’ होत असून, त्या माध्यमातून अफवा आणखी वेगाने पसरत आहे. मुळात अशी कुठलीही घटना झाली नव्हती. मात्र ती अपहरण करण्याच्या टोळीतील सदस्य असल्याचा दावा करून लोक ‘सोशल मीडिया’वर अफवा पसरवत आहेत. ‘सोशल मीडिया’वरील कुठल्याही गोष्टीवर त्वरित विश्वास ठेवण्याची गरज नाही. अगोदर खातरजमा करणे आवश्यक आहे. जर परियचातील एखाद्या व्यक्तीने अशी पोस्ट फॉरवर्ड केली तर त्यालादेखील ही बाब निदर्शनास आणून दिली पाहिजे, असे मत सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी व्यक्त केले.
पोलिसांशी येथे करावा संपर्क
- ११२ - ९८२३३९९१९९ (व्हॉट्सॲप मॅसेज क्रमांक)