उपराजधानीत मिरगीचे १५ हजार बालरुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:40 PM2019-05-30T12:40:24+5:302019-05-30T12:42:07+5:30
एका अभ्यासानुसार नागपुरात या आजाराचे ३२ हजार रुग्ण आहेत. यात १५ हजार हे बालरुग्ण आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिरगी म्हणजे अपस्मार, हा मेंदूचा आजार आहे. मेंदूमध्ये अचानक व जास्त प्रमाणात तयार होणाऱ्या विद्युतप्रवाहामुळे हा आजार होतो. जगात याचे पाच कोटी रुग्ण आहेत. एका अभ्यासानुसार नागपुरात या आजाराचे ३२ हजार रुग्ण आहेत. यात १५ हजार हे बालरुग्ण आहेत. या आजाराला औषध आहे आणि काही प्रमाणात तो टाळताही येऊ शकतो. विशेषत: गर्भावस्थेतही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेता येतात, यामुळे मिरगीला घाबरू नका, लपवू नका असे आवाहन डॉक्टरांनी बुधवारी आयोजित पत्रपरिषदेतून केले आहे. यावेळी मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. नीरज बाहेती, बालरोग तज्ज्ञ डॉ. विनीत वानखेडे व डॉ. जे. करणकुमार उपस्थित होते.
डॉ. बाहेती म्हणाले, मिरगीचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही छोटे तर काही मोठे, काही शरीराच्या एका भागात तर काही पूर्ण शरीरात होतात. काहीमध्ये शुद्ध हरपते, तर काहीमध्ये फक्त दचकल्यासारखं होते. मिरगी आजार होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. मेंदूतील अंतर्गत भागांना झालेली दुखापत, मेंदूतील गाठी, मेंदूतील अंतर्गत झटके, डोक्याला अपघातामुळे झालेली इजा किंवा जन्मत:च एखाद्या बाळाच्या मेंदूत असणारा दोष यामुळे असे झटके येतात.
‘नॉर्मल डिलिव्हरी’साठी प्रयत्न व्हायला हवेत
प्रसूत माता मिरगीची रुग्ण असलीतरी तिच्याकडून ‘नॉर्मल डिलिव्हरी’साठी प्रयत्न व्हायला हवेत, असे आवाहन डॉ. बाहेती यांनी केले. ते म्हणाले, अशा रुग्णांकडून नॉर्मल प्रसूती झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, प्रसूतीनंतर अशा माता स्तनपान करू शकतात. आजाराचा कुठलाही प्रभाव जन्मजात बाळावर होत नाही.
गर्भावस्थेत मिरगीच्या औषधाकडे दुर्लक्ष करणे धोकादायक
डॉ. बाहेती म्हणाले, साधारण दोन ते पाच टक्के गर्भवतींना मिरगीचा आजार दिसून येतो. या आजाराला घेऊन अनेक गैरसमज आहेत. यामुळे गर्भावस्थेच्या दरम्यान अनेक महिला औषधे घेणे बंद करतात. परिणामी, गंभीर स्वरूपाचा धोका होण्याची शक्यता १० टक्क्यांनी वाढते. शिवाय, कमी दिवसांचे बाळ जन्माला येण्याची, रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होत नाही. गर्भावस्थेतही औषधे घेतल्यास ९५ टक्के बालके सुदृढ जन्माला येतात.
-तर ७५ टक्के मुलांना भविष्यात औषधांची गरज पडत नाही
डॉ. विनीत वानखेडे म्हणाले, अपस्माराचे प्रमाण प्रौढ व्यक्तींमध्ये जास्त दिसत असले तरी बहुतांशवेळी त्याची सुरुवात १२ वर्षाच्या आत होते. मुलांचे योग्य वेळेत निदान झाल्यास उपचाराने ७० ते ७५ टक्के मुलांना भविष्यात औषधांची गरज पडत नाही. केवळ पाच टक्के मुलांमध्ये अपस्मारासाठी आयुष्यभर औषधोपचार करावा लागतो. मिरगीचे रुग्णही नॉर्मल जीवन जगू शकतात. सर्व खेळांमध्ये सहभागी होऊ शकतात, शिक्षणातही प्रगती करू शकतात.