ऐकावे ते नवलच; तब्बल १५ वर्ष नागपुरातील एका महिलेच्या पोटात राहिला ‘स्टोन बेबी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 10:44 AM2017-11-30T10:44:17+5:302017-11-30T10:49:34+5:30

वैद्यकीय जगताला अचंबित करणारे एक प्रकरण नागपुरात पहायला मिळाले आहे. एका महिलेच्या शरीरात ९ महिने नव्हे तर तब्बल १५ वर्षे भ्रूण होता.

For 15 years 'Stone Baby' stays in the stomach of a woman in Nagpur, | ऐकावे ते नवलच; तब्बल १५ वर्ष नागपुरातील एका महिलेच्या पोटात राहिला ‘स्टोन बेबी’

ऐकावे ते नवलच; तब्बल १५ वर्ष नागपुरातील एका महिलेच्या पोटात राहिला ‘स्टोन बेबी’

googlenewsNext
ठळक मुद्देवैद्यकीय इतिहासातील दुर्लभ घटना जगभरातील ३०० वे प्रकरण

आॅनलाईन लोकमत
नागपूर : मनुष्याने विकासाचे कितीही दावे केले तरी निसर्ग कधी काय धक्का देईल, याचा अंदाज बांधता येणे अशक्य आहे. वैद्यकीय जगताला अचंबित करणारे असेच एक प्रकरण नागपुरात पहायला मिळाले आहे. एका महिलेच्या शरीरात ९ महिने नव्हे तर तब्बल १५ वर्षे भ्रूण होता. आश्चर्याची बाब म्हणजे हा भ्रूण गर्भाशयात नव्हे तर पोटात होता. इतकी वर्षे शरीरात राहिल्याने भ्रूणाचे शरीर टणक झाले होते. वैद्यकीय परिभाषेत याला ‘स्टोन बेबी’ असे संबोधण्यात येते. शहरातील ‘लॅप्रोस्कोपिक सर्जन’ डॉ.नीलेश जुननकर यांच्या प्रयत्नांमुळे संबंधित महिलेला १५ वर्षांच्या यातनेपासून मुक्तता मिळाली.
जयश्री तायडे यांना गेल्या १५ वर्षांपासून पोटदुखीची समस्या होती. ‘अ‍ॅसिडिटी’मुळे असे होत असेल असे त्यांना वाटायचे. मात्र काही दिवसांपासून त्रास जास्त वाढला होता व उलट्या होऊ लागल्या होत्या. अखेर त्या श्रद्धानंदपेठ येथील डॉ.नीलेश जुननकर यांच्याकडे तपासणीसाठी गेल्या. डॉ. जुननकर यांनी रुग्णाचे सिटी स्कॅन केले असता आतड्यांमध्ये ‘स्टोन’सदृश गोष्टीमुळे अडथळा निर्माण झाल्याने दिसून आले. यानंतर ‘लॅप्रोस्कोपी’ करण्यात आली असता डॉ. जुननकर यांनादेखील धक्का बसला. कारण ती ‘स्टोन’सदृश गोष्ट ही चक्क चार महिन्यांचा मृत भ्रूण होता. गर्भधारणेचे वय नसताना रुग्णाच्या पोटात हा गर्भ कुठून आला ही बाब आश्चर्यचकित करणारी होती. यानंतर पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली असता या भ्रूणामुळे आतड्यांना इजा पोहोचल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी त्वरित भ्रूण आणि चार फुटांचे आतडे काढले.


पोटात कसा राहिला भ्रूण
जयश्री तायडे यांचे १९९९ साली लग्न झाले होते व २००० मध्ये त्यांनी मुलीला जन्म दिला होता. २००२ मध्ये त्या परत गर्भवती राहिल्या, मात्र काही कारणांमुळे गर्भपात करण्यासाठी त्या डॉक्टरांकडे गेल्या होत्या. पूर्णपणे गर्भपात झाल्याचा त्यांचा समज झाला होता. मात्र प्रत्यक्षात तो गर्भ त्या प्रक्रियेदरम्यान पोटात स्थानांतरित झाला. ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. ४ ते ५ महिने तो गर्भ वाढला. मात्र त्यानंतर गर्भाशयासारखे पोषक वातावरण न मिळाल्यामुळे तो मृत झाला. वर्षागणिक तो भ्रूण ‘कॅल्सिफाय’ झाला व दगडासारखा टणक झाला. मात्र यामुळे आतड्यांना इजा पोहोचत गेली, असे डॉ. नीलेश जुननकर यांनी सांगितले.


१० व्या शतकात झाली होती पहिली नोंद
‘स्टोन बेबी’चा प्रकार हा अतिशय दुर्मिळपणे आढळून येतो. ‘एक्टोपिक प्रेग्नन्सी’मध्ये भ्रूण हा ‘फॅलोपिन ट्यूब’मध्ये वाढतो व ही बाब जीवघेणी ठरू शकते. मात्र ‘स्टोन बेबी’च्या या प्रकाराला ‘लिथोपेडिओन’ असे म्हणतात. यात मृत भ्रूण हा गर्भाशयाबाहेर वाढतो आणि ‘कॅल्सिफाय’ होतो. या प्रक्रियेमुळे मातेच्या शरीरात संसर्ग होत नाही. आतापर्यंत ‘लिथोपेडिओन’च्या जगभरात केवळ ३०० प्रकरणांची नोंद झाली आहे. ९३६ ते १०१३ या कालावधीत अरब वैद्यकीय तज्ज्ञ अबू अल कासिम यांनी असे प्रकरण हाताळल्याची नोंद आहे. दर ११ हजार गर्भधारणेमागे एक प्रकरण अशाप्रकारचे होण्याची शक्यता असते. यातील अवघ्या १.८ टक्के गर्भधारणेचे परिवर्तन ‘लिथोपेडिया’मध्ये होऊ शकते, अशी माहिती डॉ.जुननकर यांनी दिली.

Web Title: For 15 years 'Stone Baby' stays in the stomach of a woman in Nagpur,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य