नागपुरात १५० कलावंतांनी रेखाटली ‘महारांगोळी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:08 AM2018-12-11T01:08:21+5:302018-12-11T01:09:15+5:30
१५० कलावंतांची जिद्द अन् सात तासांची ‘नॉन स्टॉप’ साधना यातून विदर्भातील दीडशे कलावंतांनी चक्क ६ हजार चौरस फुटात महारांगोळी रेखाटली. रांगोळीच्या सुलेखनातून संस्कार भारतीच्या संगीत, नाटक, नृत्य, चित्रकला, लोककला, रांगोळी आदी आठ कार्यविधा आणि सहा उत्सवांचे चित्रण रांगोळीतून दर्शविण्यात आले. सोबतच विदर्भाच्या प्राणवाहिन्या वैनगंगा, पैनगंगा व वर्धा या नद्यांचे प्रवाह आणि त्यावरील पौराणिक व आधुनिक तीर्थक्षेत्रे यांचे सुरेख रेखाटन करण्यात आले. संस्कार भारती आणि ‘उत्तिष्ठ:’ या संस्थेच्या वतीने रेखाटण्यात आलेल्या महारांगोळीचे लोकार्पण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १५० कलावंतांची जिद्द अन् सात तासांची ‘नॉन स्टॉप’ साधना यातून विदर्भातील दीडशे कलावंतांनी चक्क ६ हजार चौरस फुटात महारांगोळी रेखाटली. रांगोळीच्या सुलेखनातून संस्कार भारतीच्या संगीत, नाटक, नृत्य, चित्रकला, लोककला, रांगोळी आदी आठ कार्यविधा आणि सहा उत्सवांचे चित्रण रांगोळीतून दर्शविण्यात आले. सोबतच विदर्भाच्या प्राणवाहिन्या वैनगंगा, पैनगंगा व वर्धा या नद्यांचे प्रवाह आणि त्यावरील पौराणिक व आधुनिक तीर्थक्षेत्रे यांचे सुरेख रेखाटन करण्यात आले. संस्कार भारती आणि ‘उत्तिष्ठ:’ या संस्थेच्या वतीने रेखाटण्यात आलेल्या महारांगोळीचे लोकार्पण करण्यात आले.
सुरेंद्रनगर येथील बास्केटबॉल मैदानावर रेखाटण्यात आलेल्या महारांगोळीचे लोकार्पण प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सुनील बर्वे यांच्या हस्ते झाले. यावेळी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, संस्कार भारतीचे मार्गदर्शक योगेंद्र जी., विदर्भ प्रांत अध्यक्ष कमल भोंडे, नागपूर अध्यक्ष कांचन गडकरी, महारांगोळीच्या संयोजक रोहिणी घरोटे आणि ‘उत्तिष्ठ:’चे श्याम पांडे व्यासपीठावर उपस्थित होते. स्वत:च्या कलेची परिपूर्णता ही कलावंतांसाठी अनुभूती देणारी असते. मनातील कला प्रत्यक्षात साकारताना मिळणारा स्वानंद हेच कलावंतांचे सर्वोच्च पारितोषिक असते. महारांगोळीतून हीच चेतना आणि स्वानंद प्रगट झाला आहे, असे मत सुनील बर्वे यांनी व्यक्त केले.
महारांगोळीत पुरातत्त्व शास्त्रज्ञ हरिभाऊ वाकणकर, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके आणि साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांना या महारांगोळीच्या माध्यमातून रेखाटण्यात आले. राजेंद्र पुंड, अरुण लोणारकर, योगेश हेडाऊ, प्रदीप गज्जलवार व प्राचार्य राधा अतकरी यांनी या ‘पोर्ट्रेट’ रांगोळ्यांची निर्मिती केली. चंद्रकांत घरोटे, रोहिणी घरोटे, राजश्री कुलकर्णी, अनघा चेपे यांचे मार्गदर्शन लाभले तर श्रीकांत बंगाले यांनी रेखांकन आणि आरेखन केले. या उपक्रमात सहभागी कलावंतांचा सत्कार करण्यात आला. दीप्ती कुशवाह यांनी संचालन केले तर अपराजिता यांनी आभार मानले. यावेळी विश्राम जामदार, बंडोपंत रोडे, अजय देशपांडे, वीरेंद्र चांडक, प्रा. अनिल जोशी, आशुतोष अडोणी हेदेखील उपस्थित होते.