‘आधार’च्या अटीमुळे १५० उमेदवारांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 09:20 PM2019-03-05T21:20:24+5:302019-03-05T21:21:03+5:30
राज्य शासनाच्या वित्त विभागातर्फे लिपिक पदासाठी आयोजित परीक्षेपासून दीडशेहून अधिक उमेदवार वंचित राहिले. या उमेदवारांनी ‘स्मार्ट’ आधार ‘कार्ड’ आणले होते. तर अधिकारी मात्र पोस्टाद्वारे पाठविलेल्या ‘कार्ड’ची मागणी करत होते. नियमांचा हवाला देत अधिकाऱ्यांनी उमेदवारांना दिलासा देण्यास नकार दिला. परिणामी बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांना परतावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाच्या वित्त विभागातर्फे लिपिक पदासाठी आयोजित परीक्षेपासून दीडशेहून अधिक उमेदवार वंचित राहिले. या उमेदवारांनी ‘स्मार्ट’ आधार ‘कार्ड’ आणले होते. तर अधिकारी मात्र पोस्टाद्वारे पाठविलेल्या ‘कार्ड’ची मागणी करत होते. नियमांचा हवाला देत अधिकाऱ्यांनी उमेदवारांना दिलासा देण्यास नकार दिला. परिणामी बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांना परतावे लागले.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी वित्त विभागातर्फे अकाऊंट्स लिपिकपदाची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सकाळच्या सत्रात केंद्रात ८०० उमेदवारांना बोलविण्यात आले होते. परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सरकारकडून एका खासगी कंपनीला देण्यात आली आहे. उमेदवार दिलेल्या वेळेत जी.एच.रायसोनी स्कूल आॅफ बिझनेस मॅनेजमेन्ट येथील परीक्षा केंद्रावर पोहोचले. केंद्रात प्रवेश देण्याअगोदर उमेदवारांच्या ई-प्रवेशपत्रांची तपासणी करण्यात आली. सोबतच त्यांच्याकडे मूळ ओळखपत्रदेखील मागण्यात आले. दीडशेहून अधिक उमेदवारांकडे ‘स्मार्ट’ आधार ‘कार्ड’ होते. या उमेदवारांना पोस्टाद्वारे पाठविण्यात आलेले आधार ‘कार्ड’ दाखविण्यास सांगण्यात आले. ‘स्मार्ट’ आधार ‘कार्ड’वर प्रवेश नाकारण्यात आला. उमेदवारांनी अनेकदा विनंती केली. मात्र त्याला यश आले नाही. उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना कुणीच प्रतिसाद दिला नाही.
प्रवेशपत्रावर स्पष्ट सूचना
यासंबंधात परीक्षेचे आयोजन करणाऱ्या ‘एजन्सी’चे अधिकारी हकीमुद्दीन काजी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. विद्यार्थ्यांना पाठविण्यात आलेल्या प्रवेशपत्रात स्पष्ट निर्देश आहेत. शिवाय त्यात ओळखपत्र म्हणून कोणती कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील याची यादीदेखील देण्यात आली आहे. ‘स्मार्ट कार्ड’देखील ‘ई’आधार ‘कार्ड’ प्रमाणेच आहे. विभागातर्फे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार उमेदवारांना प्रवेश नाकारण्यात आला. परीक्षा न देणाऱ्या उमेदवारांची संख्या ५० हून कमी होती, असा दावा त्यांनी केला.
‘ई’ प्रवेशपत्र मान्य, मग ‘स्मार्ट कार्ड’ का नाही ?
या परीक्षेसाठी ‘ई’ प्रवेशपत्र जारी करण्यात आले होते. जर परीक्षा केंद्रावर ‘ई’प्रवेशपत्र वैध मानण्यात आले, तर मग ‘ई’ आधार वा ‘स्मार्ट कार्ड’ला ग्राह्य का धरण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अर्ज करताना ‘ऑनलाईन’ जमा केलेले छायाचित्र ‘ई’ प्रवेशपत्रावर लावायचे होते. जर उमेदवारांच्या ओळखीसंदर्भात काही शंका आली तर ‘ऑनलाईन’ तपासणीचा पर्याय होता. मात्र असे काहीही न करता अधिकाऱ्यांनी उमेदवारांना थेट बाहेरचा रस्ता दाखविला.