नागपूर रेल्वेस्थानकावर येतात १५० गाड्या, स्वच्छता मात्र केवळ १७ रेल्वेगाड्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 12:05 PM2020-03-18T12:05:13+5:302020-03-18T12:05:34+5:30

नागपूर रेल्वेस्थानकावरून दररोज १५० रेल्वेगाड्या ये-जा करतात. परंतु क्लीन ट्रेन सिस्टीमनुसार केवळ मोजक्या गाड्यांचीच सफाई होत आहे.

150 trains arrives in Nagpur railway station, only 17cleaned | नागपूर रेल्वेस्थानकावर येतात १५० गाड्या, स्वच्छता मात्र केवळ १७ रेल्वेगाड्यांची

नागपूर रेल्वेस्थानकावर येतात १५० गाड्या, स्वच्छता मात्र केवळ १७ रेल्वेगाड्यांची

Next
ठळक मुद्देपॅसेंजर गाड्या, जनरल कोच बेवारस, प्राथमिक देखभालीसाठी नाही प्लान्ट


आनंद शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना व्हायरसचा झपाट्याने प्रसार होत असल्यामुळे नागरिक दहशतीत आहेत. तर हजारो रेल्वे प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रेल्वेच्या वतीने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाय होताना दिसत नाही. त्यामुळे एसी आणि स्लिपर कोचच्या प्रवाशांसाठी रेल्वेस्थानकावर १७ गाड्यांची सफाई होत आहे. तर जनरल कोच आणि पॅसेंजर गाड्यांमधील प्रवाशांना कोरोनाच्या दहशतीत प्रवास करण्यासाठी सोडून देण्यात आले आहे. नागपूर विभागात सफाईसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला असता ही बाब निदर्शनास आली.
रेल्वेस्थानकावर ‘क्लीन ट्रेन स्टेशन’ सिस्टीमनुसार रेल्वेस्थानकावर १५ मिनिट किंवा त्यापेक्षा अधिक काळाने रवाना होणाऱ्या गाड्यांच्या सफाईचे कंत्राट जबलपूरच्या एसएस सर्व्हिसेसला पाच वर्षांसाठी देण्यात आले आहे. कंत्राटदाराला रेल्वेगाडीच्या हिशेबाने पैसे देण्यात येतात. कंत्राटातील अटीनुसार पूर्वी २४ रेल्वेगाड्यांची सफाई करण्यात येत होती. परंतु पुढे ७ गाड्यांच्या थांब्याची वेळ १५ मिनिटांपेक्षा कमी करून त्यांना क्लीन ट्रेन स्टेशन सिस्टीममधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. सध्या केवळ १७ गाड्यांचीच सफाई होत आहे. जनरल कोचकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. एसी, स्लिपर कोचमध्येही दरवाजे, शौचालय, शौचालयाच्या बाहेरील परिसर, दरवाजाच्या समोरील भागाचीच स्वच्छता होते. एका गाडीच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदाराच्या ९ टोळ्या लागतात. एका टोळीत ३ कर्मचारी असतात.
या पद्धतीने २७ कर्मचारी एका गाडीच्या सफाईचे काम करतात. काही मिनिटातच पोर्टेबल जेट मशीन, ड्राय वेट व्हॅक्युम क्लीनर, मॉपर, फिनाईलने सफाई करण्यात येते. सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत होणाºया या कामावर रेल्वे कर्मचारी लक्ष ठेवून त्याला ग्रेड देतात. ९०-१०० टक्के ग्रेड मिळाल्यास १०० टक्के पैसे आणि त्यापेक्षा कमी मिळाल्यास १० टक्के या हिशेबाने कंत्राटदाराला कमी पैसे मिळतात. हा तपासाचा भाग असला तरी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादामुळे १०० टक्के ग्रेड देण्याची शक्यता राहते. नागपूर रेल्वेस्थानकावरून दररोज १५० रेल्वेगाड्या ये-जा करतात. परंतु क्लीन ट्रेन सिस्टीमनुसार केवळ मोजक्या गाड्यांचीच सफाई होत आहे. ऑन बोर्ड हाऊस कीपिंग सर्व्हिस (ओबीएचएस) बहुतांश रेल्वेगाड्यात सुरू करण्यात आली आहे.
यात रेल्वे कर्मचारी सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान सफाई करतात. प्रवाशांच्या सूचनेनुसारही कोचची स्वच्छता करतात.
हे कर्मचारी रेल्वेगाडी जिथून निघते तिथून गाडीत चढतात आणि अखेरच्या स्टेशनपर्यंत गाडीतच राहतात. ओबीएचएसअंतर्गत बहुतांश रेल्वेगाड्यांची सफाई होत असल्याचा दावा अधिकारी करीत आहेत. परंतु अद्यापही पॅसेंजर गाड्या म्हणजे नागपूर-इटारसी पॅसेंजर, नागपूर- अमरावती पॅसेंजर, नागपूर-भुसावळ पॅसेंजरमध्ये ही सिस्टीम लागू झालेली नाही. नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, गरिबरथ एक्स्प्रेस या गाड्यातही ओबीएचएस लागू आहे. या गाड्या रात्री नागपूरवरून रवाना होऊन सकाळी अंतिम स्थानकावर पोहोचतात.
अशास्थितीत या गाड्यात ओबीएचएसचे कर्मचारी पाठविण्याची आवश्यकता नाही. प्रायमरी मेन्टेनन्समध्ये नागपूर आणि अजनीवरून सुटणाऱ्या आणि येथे समाप्त होणाºया गाड्यांची देखभाल करण्यात येते. परंतु या गाड्या जेथे समाप्त होतात तेथे त्यांचे सेकंडरी मेन्टेनन्स होते. नागपूर-अजनीत ज्या गाड्यांचे प्रायमरी मेन्टेनन्स होते, त्यात या गाड्यांची आतून आणि बाहेरून सफाई होते. यात नागपूर-मुंबई दुरांतो, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, नागपूर-पुणे गरिबरथ एक्स्प्रेस, नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस, आमला पॅसेंजर, इटारसी पॅसेंजर, अजनी-पुणे हमसफर, अजनी-एलटीटी एक्स्प्रेस, नागपूर-रिवा एक्स्प्रेस, नागपूर-अमृतसर प्रीमियम एक्स्प्रेस, नागपूर-जयपूर व्हाया अजमेर एक्स्प्रेसचा समावेश आहे. तर इंदोर एक्स्प्रेस, अमरावती-नागपूर पॅसेंजर, कोल्हापूर-नागपूर व्हाया पंढरपूर एक्स्प्रेस, नागपूर-भुसावळ व्हाया खंडवा एक्स्प्रेसमध्ये सेकंडरी मेन्टेनन्स करण्यात येते. प्रायमरी मेन्टेनन्सध्ये गाड्याची आतून-बाहेरून सफाई होत असून, सेकंडरी मेन्टेनन्समध्ये केवळ दाखविण्यासाठी सफाई होत आहे. प्रायमरी मेन्टेनन्ससाठी नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ७ च्या जवळ २००७ मध्ये ३५ लाख रुपयांचा वॉशिंग प्लान्ट तयार करण्यात आला. परंतु जुना झाल्यामुळे हा प्लान्ट हटविण्यात आला. या ठिकाणी नवा प्लान्ट होणार आहे. तोपर्यंत कंत्राटदाराच्या माध्यमातून रेल्वेगाड्यांची सफाई होत आहे.

कोरोनापासून कशी होणार सुरक्षा?
कोरोनापासून बचावासाठी गाड्यांची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कॅरेज अँड वॅगन विभागाने मास्क, सॅनिटायझर दिलेले नाही. तर प्रवाशांच्या थेट संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ते पुरविण्यात आले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचा पुरवठा करण्याची संघटनांची मागणी आहे.

Web Title: 150 trains arrives in Nagpur railway station, only 17cleaned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.