१५० वर्षे जुन्या वडाच्या झाडाला मिळाले नवजीवन; मनपाच्या उद्यान विभागाद्वारे यशस्वी पुनर्रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2022 09:36 PM2022-07-26T21:36:29+5:302022-07-26T21:37:28+5:30
Nagpur News मे महिन्यात आलेल्या वादळामुळे मुळासकट उन्मळून पडलेल्या सुमारे १५० वर्षे जुन्या वडाच्या झाडाला नवजीवन देण्यात मनपाच्या उद्यान विभागाला यश आले आहे.
नागपूर : मे महिन्यात आलेल्या वादळामुळे मुळासकट उन्मळून पडलेल्या सुमारे १५० वर्षे जुन्या वडाच्या झाडाला नवजीवन देण्यात मनपाच्या उद्यान विभागाला यश आले आहे. गोरेवाडा तलावाजवळील शासकीय क्वाॅर्टर्स परिसरात झाडाचे या पुनर्रोपण करण्यात आले होते. आता या झाडाला नवीन पालवी फुटू लागली आहे.
२४ मे रोजीच्या वादळात गोरेवाडा तलावाजवळील क्वाॅर्टर्स परिसरातील जुने विशाल वडाचे झाड मुळासकट कोलमडून पडले. या झाडाच्या पुनर्रोपणाचा निर्णय मनपाने घेतला. या झाडाचा घेर १७ फूट एवढा आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या मार्गदर्शनात उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार व त्यांच्या चमूने झाडाच्या पुनर्रोपणाची जबाबदारी पार पाडली.
उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पडलेल्या झाडाच्या सर्व फांद्या छाटल्या. मुळापासून वर २० फुटापर्यंत झाडाची उंची ठेवण्यात आली. हे करताना मनपाच्या कारखाना विभागाद्वारे जेसीबीने २५ फूट रुंद आणि १२ फूट खोल मोठा खड्डा खणण्यात आला. झाडाचे यशस्वी पुनर्रोपण केले. ही प्रक्रिया सुमारे २० ते २५ दिवस चालल्याचे अमोल चौरपगार यांनी सांगितले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे वनशेती विभागप्रमुख व्ही.एम. इल्लोरकर यांच्या सल्ल्यानुसार झाडाची मुळे विकसित करण्यासाठी औषधोपचार करण्यात आला. झाडाच्या आजूबाजूला चार पाईप टाकण्यात आले आहेत. मोठ्या पाईपाद्वारे उन्हाळ्यात झाडाला पाणी दिले जाते. तर इतर तीन पाईपांद्वारे झाडाच्या वाढीसाठी आवश्यक ग्रोथ हार्मोन्सचा पुरवठा केला जातो. मे महिन्यातील वादळानंतर पुन्हा ऊन वाढले आणि पुढे जुलै महिन्यात सतत मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र अशाही परिस्थितीत झाड टिकून आहे.