राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे १५०० कोटी थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:12 AM2021-08-17T04:12:55+5:302021-08-17T04:12:55+5:30
दयानंद पाईकराव नागपूर : एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०१६ पासून ४,८४९ कोटीची वेतनवाढ दिली. परंतु त्यापैकी प्रत्यक्षात ३,३४९ ...
दयानंद पाईकराव
नागपूर : एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०१६ पासून ४,८४९ कोटीची वेतनवाढ दिली. परंतु त्यापैकी प्रत्यक्षात ३,३४९ कोटी रुपयेच कर्मचाऱ्यांना दिले. चार वर्ष पूर्ण होऊनही या वेतनवाढीतील १,५०० कोटी रुपये अद्याप महामंडळाने दिले नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून, वाढीव वेतनवाढीची रक्कम त्वरित न दिल्यास एसटी कर्मचारी आंदोलनाच्या तयारीला लागले आहेत.
एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी दर चार वर्षानंतर करार करण्यात येतो. त्यानुसार २०१८ मध्ये एकतर्फी करार करून एसटी महामंडळाने १ एप्रिल २०१६ पासून ३१ मार्च २०२० या कालावधीसाठी ४,८४९ कोटी रुपयांच्या वेतनवाढीची घोषणा केली. परंतु योग्यरीतीने वाटप न झाल्यामुळे महामंडळाने यातील केवळ ३,३४९ कोटी रुपयेच कर्मचाऱ्यांना दिले. करार होऊन चार वर्ष उलटून गेल्यानंतरही एसटी महामंडळाने अद्यापही १,५०० कोटी रुपये कर्मचाऱ्यांना दिलेले नाही. यामुळे एक लाख एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. सध्या कोरोनामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास उशीर होत आहे. त्यात चार वर्षांपूर्वी घोषणा केलेल्या वेतनवाढीची रक्कम न मिळाल्यामुळे कर्मचारी संतापले आहेत. त्यामुळे वेतनवाढीची रक्कम त्वरित मिळावी, या मागणीसाठी ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. लॉकडाऊनमुळे एसटीची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यात कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून एसटीची चाके बंद पाडल्यास एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांची थकीत असलेली १,५०० कोटी रुपयांची रक्कम त्वरित देण्याची मागणी राज्यभरातील एसटी कर्मचारी करीत आहेत.
............
आंदोलनाचा इशारा
एसटी कामगार संघटनेची महत्त्वाची बैठक नुकतीच पुणे येथे झाली. यात संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे, अध्यक्ष संदीप शिंदे यांनी थकीत १,५०० कोटी रुपये वेतनवाढीची रक्कम, वाढीव महागाई भत्ता, वाढीव वार्षिक वेतनवाढ, घरभाडे भत्ता व इतर मागण्यांसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा एसटी महामंडळाला दिला, अशी माहिती एसटी कामगार संघटनेचे नागपूर प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार यांनी ‘लोकमत’ला दिली.
..........