१५ हजार कोटींचा घोटाळा : सीबीआयचे सुपारी माफियांकडे छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 09:32 PM2021-07-01T21:32:04+5:302021-07-01T21:34:17+5:30
CBI raids on betel mafias १५ हजार कोटींच्या घोटाळ्यांशी जुळल्याच्या संशयावरून नागपूरसह ठिकठिकाणच्या सुपारी व्यापाऱ्यांकडे सीबीआयने छापेमारी करून महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतले. या कारवाईमुळे नागपूरसह मध्यभारतातील सुपारी व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १५ हजार कोटींच्या घोटाळ्यांशी जुळल्याच्या संशयावरून नागपूरसह ठिकठिकाणच्या सुपारी व्यापाऱ्यांकडे सीबीआयने छापेमारी करून महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतले. या कारवाईमुळे नागपूरसह मध्यभारतातील सुपारी व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
सडक्या सुपारीचा गोरखधंदा करून नागरिकांच्या आरोग्यांशी खेळणारे तसेच सरकारला कराच्या रुपात कोट्यवधींचा फटका देणारे मोठमोठे सुपारी तस्कर नागपुरात आहेत. त्यांचे धागेदोरे देशातील विविध प्रांतात जुळले आहेत. त्यांच्यापैकीच काही जणांची जंत्री सीबीआयच्या हाती लागली. या पार्श्वभूमीवर, २५ जूनला सीबीआयने नागपूर, मुंबई, अहमदाबादमध्ये १९ ठिकाणी एकाचवेळी छापे घातले. नागपुरातील तीन बड्या सुपारी व्यापाऱ्यांकडेही हे छापे घालण्यात आले. त्यांच्या भावसार चाैकातील गोदाम, रामनगरातील ट्रेडर्स, शांतीनगरातील ट्रेडर्स आणि गोदाम तसेच वर्धमानगरातील गोदामात अशा पाच ठिकाणी सीबीआयने छापेमारी केली. या छाप्यात सुपारीच्या गोरखधंद्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे सीबीआयने मोठ्या प्रमाणात जप्त केली. बुधवारी त्याचा बोभाटा झाला. यामुळे मध्यभारतातील सुपारी माफियांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
हे आहेत नागपुरातील व्यापारी
ज्यांच्याकडे सीबीआयची छापेमारी झाली, ते नागपुरातील सुपारी व्यापारी पुढील प्रमाणे आहेत.
मोहम्मद रजा अब्दुल गनी तंवर (भावसार चाैक), बुरहान अख्तर (शांतीनगर) आणि हिमांशु भद्रा (वर्धमाननगर) अशी या व्यापाऱ्यांची नावे आहेत. यातील रजा यांच्या ट्रेडर्स आणि घानीवाला (रामनगर) येथे, अख्तर यांच्या शांतीनगरातील, तर भद्रांच्या वर्धमाननगरातील गोदामात छापेमारी करून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी प्रदीर्घ चाैकशी केली आहे.