मास्क न वापरणाऱ्या १५१ नागरिकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:09 AM2021-02-23T04:09:58+5:302021-02-23T04:09:58+5:30
नागपूर : वाढता कोविड संसर्ग विचारात घेता, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश ...
नागपूर : वाढता कोविड संसर्ग विचारात घेता, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहे. त्यानुसार मनपाच्या उपद्रव शोध पथकामार्फत दररोज कारवाई केली जात आहे. रविवारी १५१ लोकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७५ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्कही देण्यात आले. पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३३,१३० नागरिकांविरुद्ध कारवाई करून, १ कोटी ४९ लाख २४ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत चालली असून कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका कायम आहे. असे असूनही अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. विनामास्क नागरिक फिरताना दिसतात, ही बाब घातक आहे. नागपुरात रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाचे उपद्रव शोध पथक दररोज सर्व झोनमधील मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुद्ध कारवाई करीत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे अशा सूचना नागपूर मनपाद्वारे वारंवार केली जात आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन मनपाने केले आहे.