नागपूर विभागात १.५३ लाख विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2023 09:19 PM2023-03-01T21:19:07+5:302023-03-01T21:21:30+5:30
Nagpur News राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावी बाेर्डाची परीक्षा गुरुवारपासून सुरू हाेत आहे.
नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावी बाेर्डाची परीक्षा गुरुवारपासून सुरू हाेत आहे. मराठीच्या पेपरने परीक्षेला सुरुवात हाेत आहे. नागपूर विभागाच्या ६ जिल्ह्यांमधून १ लाख ५३ हजार ६६४ विद्यार्थ्यांची कसाेटी लागणार आहे. यामध्ये ७९,१२६ विद्यार्थी आणि ७४,५२५ विद्यार्थिनींचा समावेश आहे.
२१ फेब्रुवारीपासून बारावी बाेर्डाची परीक्षा सुरू झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षेचे वेध लागले हाेते. काेराेनानंतर पहिल्यांदा सामान्य परीक्षा हाेत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक असण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यातून ५९,२३८ विद्यार्थी परीक्षेला बसणार असून यात ३०,०४१ मुले व २९,१९४ मुलींचा समावेश आहे. ३२,११२ शहरी आणि २७,१२६ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नागपूर विभागात ६८२ केंद्र निर्धारित केले आहेत. नागपूर जिल्ह्यात शहरात ९६ आणि ग्रामीण भागात १२६ केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाने बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेसाठी काॅपीमुक्त अभियान राबविले आहे. ते यशस्वी करण्यासाठी नागपूर विभागीय मंडळाने तयारी केली आहे. प्रत्येक केंद्रावर एका निरीक्षकांसह ८४ पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत जिल्हा दक्ष समिती तयार करण्यात आली असून विभागीय शिक्षण मंडळासह महसूल,शालेय शिक्षण समितीचे अधिकारी असलेले भरारी पथक कार्यरत राहणार आहेत. गैरप्रकार टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा हाॅलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी झडती घेण्यात येईल. आवश्यक साहित्याव्यतिरिक्त काहीही आतमध्ये नेण्यास मनाई आहे. सामूहिक काॅपी करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या केंद्रांवर विभागाची करडी नजर असणार असल्याचे नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनी सांगितले.
११ वाजता मिळेल प्रश्नपत्रिका
यावेळी बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेतही १० मिनिटाआधी प्रश्नपत्रिका देण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे. ११ वाजता पेपर सुरू हाेणार असून त्याच वेळी प्रश्नपत्रिका वितरित केली जाईल. वेळ संपल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकचे १० मिनिटे देण्यात येतील. प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याला लाईव्ह लाेकेशनद्वारे ट्रॅक केले जाईल.
पहिल्यांदा १३ तृतीयपंथीयांची नाेंद
बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेतही यंदा १३ तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश राहणार आहे. यात नागपूर शहरामधून २ व ग्रामीण मधून एकाचा समावेश आहे. विभागात गडचिराेलीत सर्वाधिक ८ तृतीयपंथी विद्यार्थी परीक्षेला बसतील. याशिवाय भंडारा व चंद्रपूर मध्ये प्रत्येकी एका तृतीयपंथी विद्यार्थ्याची नाेंद झाली आहे.