बारावीच्या १.५५ लाख विद्यार्थ्यांची आजपासून कसाेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2023 08:00 AM2023-02-21T08:00:00+5:302023-02-21T08:00:02+5:30
Nagpur News नागपूर जिल्ह्यात ६२,५४९ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत, तर नागपूर विभागातील ६ जिल्ह्यांतील १ लाख ५५ हजार ९१३ विद्यार्थी परीक्षा देतील.
नागपूर : राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा मंगळवारपासून (दि. २१) सुरू हाेत आहे. नागपूर जिल्ह्यात ६२,५४९ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत, तर नागपूर विभागातील ६ जिल्ह्यांतील १ लाख ५५ हजार ९१३ विद्यार्थी परीक्षा देतील. यात ७६,५७१ विद्यार्थिनी आणि ७९,३३२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात १६२ तर विभागात ४८४ परीक्षा केंद्र निर्धारित करण्यात आली आहेत. काेराेना प्रभावात तीन वर्षे गेल्यानंतर यंदाची परीक्षा सुरळीत व १०० टक्के अभ्यासक्रमावर हाेणार आहे.
नागपूर विभागात एकूण विद्यार्थ्यांपैकी विज्ञान शाखेचे ७६,१०२ विद्यार्थी, कला शाखेचे ५४,१३९, वाणिज्य शाखेच्या १९,१२५ विद्यार्थ्यांची नाेंद झाली आहे. याशिवाय एमसीव्हीसीचे ६,१५८ आणि आयटीआयचे ३८९ विद्यार्थी परीक्षेला बसतील. राज्य मंडळाने राज्यभरात काॅपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी व्यवस्था केली आहे. त्यानुसार गैरप्रकार राेखण्यासाठी नागपूर बाेर्डानेही उपाययाेजना केल्या आहेत. यासाठी शिक्षण विभागासह पाेलिस, महसूल विभाग व अंगणवाडी सेविकांनाही जबाबदारी देण्यात आली आहे. यंदा परीक्षा केंद्रावर प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांची झडती घेतली जाईल. शिवाय तालुकास्तरीय भरारी पथकांसह नागपूर विभागीय मंडळाने ८४ भरारी पथके सज्ज केली आहेत. काॅपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी यावेळी परीक्षा केंद्राच्या ५० मीटरच्या परिसरात असलेली झेराॅक्स सेंटर बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तब्बल तीन वर्षांनंतर यावेळी परीक्षा सुरळीत हाेणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे २०२१ची दहावी, बारावीची परीक्षा झाली नव्हती. त्यासाठी अंतर्गत मूल्यमापन गुणदान करण्यात आले होते. २०२२मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम होता. परीक्षा घेण्यात आली; परंतु शाळा तेथे केंद्र, २५ टक्के अभ्यासक्रम कमी, अधिकचा वेळ असे बदल मंडळाने केले होते. २०२३ची परीक्षा प्रभावमुक्त असून, १०० टक्के अभ्यासक्रमावर हाेत आहे. मास्क किंवा इतर काेराेना प्रतिबंधात्मक उपाय राहणार नाहीत.
यंदा १० तृतीयपंथी परीक्षेला
बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी कसाेटीची असते. यंदाच्या परीक्षेचे विशेष म्हणजे विभागात १० तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंद केली आहे. यात नागपूर जिल्ह्यातून सर्वाधिक ५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय भंडाऱ्यातून २ तर चंद्रपूर, गडचिराेली व गाेंदिया जिल्ह्यातून प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.