नागपुरात अधिवेशन अन् गोरेवाड्यात आढळली एसएलआरची १५६ जिवंत काडतूसं, नक्षली कनेक्शनचा तपास सुरू

By योगेश पांडे | Published: December 9, 2023 10:07 PM2023-12-09T22:07:47+5:302023-12-09T22:10:34+5:30

अधिवेशन सुरू असल्याने पोलीस दलात खळबळ; ३२ वर्ष जुनी काडतुसे, नक्षली ‘कनेक्शन’चा तपास सुरू

156 live SLR cartridges found in Gorewada in Nagpur, Naxal connection investigation underway | नागपुरात अधिवेशन अन् गोरेवाड्यात आढळली एसएलआरची १५६ जिवंत काडतूसं, नक्षली कनेक्शनचा तपास सुरू

प्रतिकात्मक फोटो

नागपूर : उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरू असताना नागपूर पोलिसांची चिंता वाढविणारी मोठी घटना शनिवारी घडली. गोरेवाडा येथील जंगलाजवळ ‘एसएलआर’ रायफलची १५६ जिवंत काडतुसे सापडली. ३२ वर्षे जुने ही काडतुसे असून यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा उच्चस्तरीय पातळीवरून तपास सुरू झाला आहे. यामागे नक्षली ‘कनेक्शन’ आहे का याचा तपास करण्यात येत आहे.

काटोल रस्त्यावर गोरेवाडा जंगल परिसर आहे. दुपारी पाऊण वाजताच्या सुमारास एक व्यक्ती लघुशंकेसाठी गेला असता त्याची नजर नाल्याजवळ असलेल्या एका पिशवीवर पडली. त्यात त्याला काडतुसे दिसली. त्याने लगेच गिट्टीखदान पोलीस ठाण्यात ही माहिती दिसली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या पथकाने येऊन तपासणी केली असता त्या बॅगमध्ये १५६ जिवंत काडतुसे आढळून आली. लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली.

फॉरेन्सिक टीम, बॉम्ब शोधक आणि डिस्पोजल टीमसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बीडीडीएस पथकाने कुत्र्यांच्या मदतीने परिसराची तपासणी केली. यानंतर पोलिसांनी गोळ्या जप्त केल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या गोळ्या खूप जुन्या असल्याचे दिसत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसएलआर रायफलचा वापर फक्त पोलीस आणि निमलष्करी दल करतात. घटनास्थळापासून शहर पोलीस मुख्यालय काही अंतरावर आहे. जप्त करण्यात आलेल्या गोळ्या पोलिसांनी वापरलेल्या रायफलमधील आहेत का, याचा तपास करण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेल्या गोळ्यांची फॉरेन्सिक तपासणी करत आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

Web Title: 156 live SLR cartridges found in Gorewada in Nagpur, Naxal connection investigation underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.