नागपूर विभागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे १,५६३ नमुने फ्लोराईडबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 08:44 PM2020-08-10T20:44:34+5:302020-08-10T20:47:36+5:30
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांपैकी १ हजार ५६३ नमुने फ्लोराईडयुक्त आढळले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांपैकी १ हजार ५६३ नमुने फ्लोराईडयुक्त आढळले आहेत. विदर्भात सर्वाधिक प्रमाण नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात असून जलस्वराज प्रकल्पाच्या माध्यमातून यावर उपाययोजना केली जात आहे.
भूगर्भामध्ये रूपांतरित खडकांचे प्रमाण अधिक असलेल्या भागांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागामध्ये असे फ्लोराईडयुक्त पाणी आहारात वापरण्यात आल्याने हाडे ठिसूळ होणे, दात पिवळे पडणे, पाय वाकडे होणे असे प्रकार आढळायला लागले होते. त्यामुळे शासनाने २००२ पासून जलस्वराज प्रकल्पाच्या माध्यमातून अशा गावांची निवड करून उपाययोजना केल्या होत्या. जलस्वराज प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर २०१६ पासून दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या अंतर्गत २०२० पर्यंत संबंधित गावांमध्ये उपाययोजना केल्या जाणार आहेत.
गावांमध्ये असलेल्या विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी गावाच्या जलसुरक्षकाकडून नमुने गोळा केले जातात. त्याची तपासणी उपविभागीय, जिल्हास्तर आणि विभागीय प्रयोगशाळामंमध्ये केली जाते. नागपूर विभागात विभागस्तरावर एक प्रयोगशाळा असून जिल्हास्तरावर ५ आणि उपविभाग स्तरावर २५ प्रयोगशाळा आहेत. याचे सनियंत्रण उपविभागीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी नियंत्रण व गुणवत्ता अधिकाऱ्यांकडे असते. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडे हे एक पद निमाण करण्यात आले आहे. गावातील विहिरींच्या किंवा बोअरवेलच्या पाण्यामध्ये १.५ मिलिग्रॅम प्रति लिटर फ्लोराईड आढळल्यास ते पाणी पिण्यास अयोग्य ठरविले जाते. असे १ हजार ५६३ नमुने जुलै महिन्याअखेरच्या तपासणीमध्ये फ्लोराईडयुक्त आढळले आहेत.
यापूर्वी झालेल्या उपाययोजनांमध्ये जलस्वराज प्रकल्प-एकच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात सावनेर, काटोल, पारशिवनी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात डोंगरगाव येथे डी फ्लोरिडेशन युनिट लावण्यात आले आहेत.
नागपूर विभागामध्ये नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. संबंधित गावांमधील पाण्याचे नमुने गोळा करून आलेल्या अहवालानंतर उपविभागीय सनियंत्रकांकडून त्यावर उपायोजना केल्या जातात. जलस्वराज प्रकल्पात याचा समावेश असून त्या माध्यमातून उपायोजना सुरू आहेत.
- डॉ. शिवाजी पदमने,
प्रभारी उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा