१५७ लोकसंख्येच्या गावात १५०० पशुधन
By admin | Published: October 26, 2014 12:13 AM2014-10-26T00:13:55+5:302014-10-26T00:13:55+5:30
सोयाबीन व मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला उमरेड तालुका आता दूध उत्पादनातही नावारूपास येत आहे. तालुक्यातील डोंगरगावची लोकसंख्या ही १५७ असली तरी येथील पशुधनाची संख्या मात्र १५०० आहे.
डोंगरगावने ठेवला आदर्श : रोज ३००० लिटर दुधाची विक्री
अशोक ठाकरे - उमरेड
सोयाबीन व मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला उमरेड तालुका आता दूध उत्पादनातही नावारूपास येत आहे. तालुक्यातील डोंगरगावची लोकसंख्या ही १५७ असली तरी येथील पशुधनाची संख्या मात्र १५०० आहे. त्यामुळे या डोंगरगावात रोज तीन हजार लिटर दुधाचे उत्पादन केले जाते. विशेष म्हणजे, या गावात गवळी समाजबांधवांची संख्या बरीच मोठी आहे.
उमरेड तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी वसलेले ‘आलागोंदी’ हे गाव! सन १९५० मध्ये लागलेल्या वणव्यामुळे आलागोंदी हे गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. पुढे येथील नागरिकांनी परिस्थितीशी संघर्ष करीत शेजारी नवे गाव वसविले, ते म्हणजे, डोंगरगाव! आज या गावाची लोकसंख्या ही १५७ एवढी आहे. डोंगरगावात ९० टक्क्यांपेक्षा अधिक गवळी समाजबांधव वास्तव्याला असल्याने तसेच गोपालन हा त्यांचा परंपगरागत व्यवसाय असल्याने या गावातील पशुधनाची संख्या ही १५०० च्या वर आहे. येथे गुरे बांधण्यासाठी एकही गोठा बघावयास मिळत नाही. प्रत्येकाच्या घरासमोर ‘वाडगा’ (कुंपण असलेली गुरे बांधण्याची जागा) आहे. या वाडग्यातच गुरे मोकळी सोडली जातात. तिन्ही ऋतुत उन्ह, वारा, पाऊस, थंडी सहन करीत ही जनावरे याच वाडग्यात राहतात. गुरे बांधण्यासाठी गोठ्याची पद्धती येथील ग्रामस्थांनी अद्यापही अवलंबिली नाही.
येथे राज तीन हजार लिटर दुधाचे उत्पादन होत असून, या दुधाची विक्री शहरातील हॉटेल व खासगी दूध डेअरीला करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक दूध उत्पादक धनराज काकडे यांनी दिली. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या गावाची कायम उपेक्षा केली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती नसल्याने येथील ग्रामस्थ परंपरागत पद्धतीने व्यवसाय करीत आहेत. येथे शालांत परीक्षेपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणांची संख्याही बोटावर मोजण्याइतकी आहे. शिक्षणातील मुलींचे प्रमाण नगण्य आहे.
येथील एकाही तरुणाला शासकीय नोकरी मिळालेली नाही. दहावी उत्तीर्ण असलेला अपंग गिरीश हा पानटपरी चालवून उदरनिर्वाह करतो. अपंगाच्या प्रमाणपत्रासाठी संबंधित अधिकाऱ्याने आपल्याला पाच हजार रुपयांनी मागणी केल्याची व्यथाही त्याने व्यक्त केली.
उमरेड-लोहारा-बेला मार्गावरील डोंगरगाव विकासापासून कोसो दूर आहे. येथे एकमेव सिमेंट रोड असून एकाही नालीचे सिमेंटने बांधकाम करण्यात आले नाही. या गावाचा समावेश खुर्सापार (उमरेड) या गटग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवर येथील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता.