१६ राज्य पालथे घालत स्वच्छतावारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 01:15 AM2017-10-09T01:15:38+5:302017-10-09T01:15:49+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला गावोगाव पोहोचविण्याच्या उद्देशाने प. बंगालमधील जयदेवने सहा महिन्यापूर्वी घरदार सोडले. १६ राज्य पालथे घालत स्वच्छतेचा प्रचार-प्रसार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला गावोगाव पोहोचविण्याच्या उद्देशाने प. बंगालमधील जयदेवने सहा महिन्यापूर्वी घरदार सोडले. १६ राज्य पालथे घालत स्वच्छतेचा प्रचार-प्रसार केला. गाव स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. वाटेतच वडिलांच्या मृत्यूची बातमी त्याला कळली. परंतु कोसोदूर गाव असल्यामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही मुकण्याची पाळी या स्वच्छतेचा संदेश देणाºया स्वच्छतादूतावर आली.
पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील चाबदानी येथील जयदेव उद्धव राऊत (४७) हा ज्यूट मिलमध्ये कामगार म्हणून कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान गावोगाव पोहोचविण्याची खूणगाठ त्याने मनाशी बांधली. अंगावरील कपडे आणि सायकलसह तो पत्नी अन् मुलीचा निरोप घेऊन घराबाहेर पडला. मिलमधून सहा महिन्याची सुटीही त्याने मॅनेजरकडून मिळविली. २६ फेब्रुवारी २०१७ रोजी त्याने सुरू केलेला प्रवास आजपर्यंत सुरू आहे. सायंकाळी भाजप कार्यालयात जाऊन भेट देणे, कुणी भोजनाची व्यवस्था केलीच तर ठीक नाही तर आपल्याच पैशाने काही तरी खाऊन झोपी जायचे अन् सकाळी पुढील प्रवासाला निघायचे असाच जयदेवचा दिनक्रम मागील सहा महिन्यापासून आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, जम्मू, हिमालच प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या मार्गाने तो नागपुरात दाखल झाला. जयदेव ३० जूनला चंदीगडमध्ये असताना त्याला वडिलांचा मृत्यू झाल्याची बातमी कळाली. परंतु जवळ पैसे नसल्यामुळे आणि घरापासून कोसोदूर असल्यामुळे तो अंत्यसंस्कारालाही जाऊ शकला नाही.
नागपुरातून तो छत्तीसगडमध्ये जाणार आहे. घरदार सोडून स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी जयदेवने सुरू केलेली वारी रस्त्यावर कचरा फेकणाºयांच्या डोळ्यात अंजन घालणारीच आहे. त्याच्या मोहिमेपासून नागरिकांनी पुढाकार घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे ठरविल्यास, ते त्याच्या मोहिमेचे फलित ठरणार आहे.