नागपूर जिल्ह्यात पेंच धरणाचे १६ दरवाजे उघडले; श्री क्षेत्र घोगरा बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2022 08:33 PM2022-08-10T20:33:28+5:302022-08-10T20:34:13+5:30
Nagpur News पाणलाेट क्षेत्रात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तोतलाडोह धरणातील पाणी पेंच धरणात सोडण्यात आले आहे. त्यामुळे पेंच धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. बुधवारी पेंचचे १६ दरवाजे उघडण्यात आले.
नागपूर : पाणलाेट क्षेत्रात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तोतलाडोह धरणातील पाणी पेंच धरणात सोडण्यात आले आहे. त्यामुळे पेंच धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. बुधवारी पेंचचे १६ दरवाजे उघडण्यात आले. सध्या पेंच नदी ओसंडून वाहत आहे. प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे .
मध्य प्रदेशात रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. मध्य प्रदेशातील चौराही धरणातून पाणी तोतलाडोह धरणात येते. पुढे तोतलाडोहाचे पाणी पेंच धरणात सोडण्यात येते. त्यामुळे पेंच धरणातील पाणीसाठ्यात मंगळवारी रात्रीपासून वाढ झाली. बुधवारी सकाळी ८ वाजता पेंच धरणाचे सर्व १६ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले होते. सायंकाळी ५.३० वाजता ८ दरवाजे ३ मीटरने, तर उर्वरित ८ दरवाजे २.५० मीटरने उघडण्यात आले. यातून ४०९६.८०० क्यूमेक पाण्याचा विसर्ग पेंच नदीत सुरू होता.
कुवारा भिवसेन देवस्थान पेंच नदीच्या काठावर असल्यामुळे मंदिराचा परिसर पाण्याने वेढला आहे. पारशिवणीपासून तीन कि.मी. अंतरावरील श्री क्षेत्र घोगरा महादेव देवस्थान पूर्णतः पाण्यात बुडालेले आहे. येथे दगडावरून पाणी ओसंडून वाहत असल्यामुळे ठिकठिकाणी धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.