नागपुरात व्यावसायिकाच्या खात्यातून उडवले १६ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 07:43 PM2021-04-22T19:43:08+5:302021-04-22T19:44:48+5:30
Nagpur news धंतोलीतील एका व्यावसायिकाच्या नावाने सायबर गुन्हेगारांनी बँकेत फोन करून त्यांच्या खात्यातील सोळा लाख रुपये परस्पर ट्रान्सफर करून घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धंतोलीतील एका व्यावसायिकाच्या नावाने सायबर गुन्हेगारांनी बँकेत फोन करून त्यांच्या खात्यातील सोळा लाख रुपये परस्पर ट्रान्सफर करून घेतले. ८ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर बुधवारी प्रतापनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रकाश जैन (वय ७०)असे फिर्यादी व्यावसायिकांचे नाव आहे. ते ऑटो एजन्सीचे संचालक आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या खामला शाखेत जैन यांचे बँक खाते आहे. ८ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजता बँकेत जैन यांच्या नावाने दुसऱ्याच एका व्यक्तीने फोन केला आणि १६ लाख पाच हजार रुपयांची रक्कम दोन वेगवेगळ्या खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानुसार बँक अधिकाऱ्यांनी ही रोकड त्या बँक खात्यात जमा केली.
बुधवारी हा प्रकार उघडकीस आला. जैन यांनी बँक अधिकाऱ्यांकडे यासंबंधाने विचारणा केली असता त्यांनी आम्हाला तुमचाच फोन आला होता म्हणून आम्ही बँकेत त्या खात्यात रक्कम जमा केली, असे सांगितले. जैन यांनी फोन केलाच नव्हता असे सांगितले असता अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले. त्यामुळे अखेर जैन यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला
बँक अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा
या प्रकरणात बँक अधिकाऱ्यांचाही दोष असल्याचे पोलिसांचे मत आहे. एवढी मोठी रक्कम दुसऱ्या खात्यात वळती करताना पुरेशी काळजी बँक अधिकाऱ्यांनी का घेतली नाही, असा प्रश्न आहे. त्यामुळे पोलीस संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करणार आहेत.
बिहारचे गुन्हेगार !
प्राथमिक तपासानुसार जैन यांच्या खात्यातून वळती करण्यात आलेली रक्कम बिहारच्या बँक खात्यात जमा झाल्याचे समजते.
----