ठगबाज महाजनकडून १६ लाखाचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 10:01 PM2020-07-25T22:01:18+5:302020-07-25T22:03:19+5:30
अनेक ठिकाणच्या सराफा व्यावसायिकांना गंडविणारा ठगबाज आशुतोष अशोक महाजन याच्याकडून तहसील पोलिसांनी १६ लाख ५३ हजाराचा ऐवज जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक ठिकाणच्या सराफा व्यावसायिकांना गंडविणारा ठगबाज आशुतोष अशोक महाजन याच्याकडून तहसील पोलिसांनी १६ लाख ५३ हजाराचा ऐवज जप्त केला.
ठगबाज महाजनने इतवारी, हुडकेश्वर, अजनीसह ठिकठिकाणच्या सराफा व्यावसायिकांना लाखोंचा गंडा घातला आहे.
दुकान बंद करण्याच्या तयारीत असताना तो सराफा व्यावसायिकांकडे जात होता. घरी धार्मिक पूजा सुरू आहे. त्यासाठी तातडीने दागिने किंवा सोन्याचे शिक्के पाहिजे असे सांगून तो तेथून खरेदी करायचा आणि गडबडीत रोख रक्कम आणायची विसरलो, असे सांगून आरोपी सराफा व्यावसायिकाला बनावट धनादेश द्यायचा. हे धनादेश बँक खात्यात पैसे नसल्यामुळे वटत नव्हते; नंतर फसवणूक झाल्याचे व्यापाऱ्यांच्या लक्षात यायचे. महाजन याने अशाप्रकारे अनेक व्यापाऱ्यांची लाखो रुपयांनी फसवणूक करून त्यांच्याकडून वेगळ्या प्रकारचे दागिने लंपास केले होते. त्याच्याविरुद्ध २२ जुलैला तहसील पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. तहसीलचे ठाणेदार जयेश भांडारकर, निरीक्षक दिलीप सागर आणि त्यांच्या सहकाºयांनी २३ जुलैला आरोपी महाजनच्या मुसक्या बांधल्या. त्याची चौकशी करून त्याच्याकडून १६ लाख ५३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, नाणी आणि बनावट चेक जप्त करण्यात आले.
वाहनेही जप्त
आरोपीने अशाप्रकारे फसवणूक करून होंडा सिटी कार आणि अॅक्टिव्हा घेतली. ही दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली. त्याने नागपूरच नव्हे तर इतर ठिकाणच्या सराफा व्यापाऱ्यांना अशाच प्रकारे गंडविल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याने एकट्या इतवारीतील १० ते १५ सराफा व्यावसायिकांना लाखोंचा गंडा घातला आहे.
राहण्याचे ठिकाण वारंवार बदलवितो
आरोपी महाजन वारंवार राहण्याचे ठिकाण बदलवीत होता. महाल, अजनी, नंदनवन, मनीषनगर अशी वेगवेगळी ठिकाणे तो व्यापाऱ्यांना सांगत होता. तहसील पोलिसांनी त्याला रमना मारोती परिसरात राहत असताना ताब्यात घेतले. आता त्याला अजनी पोलीस ताब्यात घेणार आहेत.