१६ स्कूल बसेस जप्त

By admin | Published: June 25, 2014 01:26 AM2014-06-25T01:26:01+5:302014-06-25T01:26:01+5:30

उन्हाळी सुट्यांमध्ये स्कूल बस आणि स्कूल व्हॅनमध्ये नियमांची पूर्तता करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) केले होते. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन बहुसंख्य

16 school buses seized | १६ स्कूल बसेस जप्त

१६ स्कूल बसेस जप्त

Next

२७ बसेसला नोटीस : कशी होणार विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक?
नागपूर : उन्हाळी सुट्यांमध्ये स्कूल बस आणि स्कूल व्हॅनमध्ये नियमांची पूर्तता करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) केले होते. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन बहुसंख्य शाळा गंभीर नसल्याचे शहरातील चित्र आहे. आरटीओ, शहरने सोमवारपासून सुरू केलेल्या तपासणीच्या आज दुसऱ्या दिवशी ४३ स्कूल बसेस दोषी आढळून आल्या. यातील १६ बसेस जप्त तर २७ बसेसना नोटीस बजावून सोडून देण्यात आले.
आरटीओ, शहरकडून मागील शैक्षणिक वर्षात साधारण पाच-सहा वेळा स्कूल बस तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळीही शेकडो बसेसवर कारवाई झाली. त्यानंतरही विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला घेऊन शाळा प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येते. तीन पथकाच्या मदतीने सकाळी ६.३० ते ९.३० दरम्यान ७० स्कूल बस व व्हॅनची तपासणी करण्यात आली. यात दोषी आढळलेल्या ४३ वाहनांमध्ये तुटलेले स्पीड गव्हर्नर, अग्निशमन यंत्राचा अभाव, नादुरुस्त डोअर बेल, इमर्जन्सी विंडो आणि फिटनेसचे प्रमाणपत्र नसलेल्या त्रुटी आढळून आल्या. यातील १२ स्कूल बसेस तर पाच व्हॅन जप्त करण्यात आल्या. २७ वाहनांना नोटीस बजावण्यात आल्या असून त्यांना आठवड्याभरात नियमांची पूर्तता करायची आहे. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) विजय चव्हाण आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) रवींद्र भुयार यांच्या मार्गदर्शनात झाली.
आरटीओ फुल्ल
तब्बल १६ स्कूल बस आणि व्हॅनवर जप्तीची कारवाई केल्याने शहर आरटीओ कार्यालय आज फुल्ल झाले होते. वाहन उभे करायला कुठेच जागा नव्हती. यामुळे ट्रायल आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी येणाऱ्या वाहनांना अडचणीचे गेले. बेशिस्त पार्किंगवरही आरटीओने कारवाई केली.
पालकांची दमछाक
सकाळच्या पाळीतील विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या व सोडून देत असलेल्या स्कूल बसेसवर जप्ती कारवाई झाल्याने काही कंत्राटदारांनी आपल्या बसेस शाळेत उभ्या केल्या.
यामुळे विद्यार्थ्यांना परत घरी सोडण्यासाठी बसेस कमी पडल्या. अनेक शाळा प्रशासनाने पालकांना फोनद्वारे कारवाईची माहिती देत, विद्यार्थ्यांना शाळेतून घेऊन जाण्यास सांगितले. यात पालकांची चांगलीच दमछाक झाली. (प्रतिनिधी)

Web Title: 16 school buses seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.