आठ महिन्यात १६ टन ऑक्सिजनची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:08 AM2021-05-14T04:08:13+5:302021-05-14T04:08:13+5:30
पॉझिटिव्ह स्टोरी सुमेध वाघमारे नागपूर: कोरोनाची पहिली व दुसरी लाट इतकी भयावह ठरली की आरोग्य यंत्रणा त्याच्यापुढे तोकडी पडली. ...
पॉझिटिव्ह स्टोरी
सुमेध वाघमारे
नागपूर: कोरोनाची पहिली व दुसरी लाट इतकी भयावह ठरली की आरोग्य यंत्रणा त्याच्यापुढे तोकडी पडली. औषधांसह ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाला. ऑक्सिजनअभावी रुग्णांचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी मेयोच्या बधिरीकरण विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ. वैशाली शेलगावकर यांनी पुढाकार घेतला. ऑक्सिजन बचतीची अभिनव मोहिमच त्यांनी हाती घेतली. त्यात सातत्य ठेवले. परिणामी, गेल्या आठ महिन्यात जवळपास १६ टन ऑक्सिजनची बचत करण्यात त्यांना यश आले. त्यांचे हे प्रयत्न इतर रुग्णालयांसाठी ‘मॉडेल’ ठरले आहे.
कोरोना विषाणू रुग्णाच्या फुफ्फुसांवर थेट हल्ला करतो. यामुळे शरिरातील ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण घसरते. श्वास घेणेही कठीण जाते. अशास्थितीत रक्तामधील ऑक्सिजन पातळी राखण्यासाठी ‘ऑक्सिजन थेरपी’ दिली जाते. मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण दिसून आल्यावर, सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. मागणीच्या तुलनेत ऑक्सिजन कमी पडू लागल्याने तुटवडा पडला. इतर रुग्णालयांसारखेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) रुग्ण अडचणीत आले होते. ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू होऊ नये म्हणून डॉ. शेलगावकर यांनी ऑक्सिजन बचतीची मोहिमच हाती घेतली. डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार केले. रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटपासून ते रुग्णांच्या बेडपर्यंत पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजनची गळती शोधून काढण्यास सुरुवात केली. गरज नसताना रुग्णाला जास्त प्रमाणात दिला जाणारा ऑक्सिजन थांबविला. ऑक्सिजनवरील रुग्णाला ऑक्सिजन बंद-सुरू करण्याचे प्रशिक्षण दिले. यामुळे जेवताना किंवा टॉयलेटला जाताना ऑक्सिजन पुरवठा बंद होऊ लागला. रुग्णालयातून सुटी झालेल्या किंवा मृत्यू झालेल्या रुग्णांचा सुरूच राहणारा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याकडे विशेष लक्ष दिले. या सर्वांचा परिणाम म्हणजे, दर महिन्याला जवळपास २ टन ऑक्सिजनची बचत होऊ लागल्याचे दिसून आले. सप्टेंबर २०२० पासून सुरू झालेल्या या ऑक्सिजन बचत मोहिमेमुळे तब्बल १६ टन ऑक्सिजन वाचविण्यास डॉ. शेलगावकर व त्यांच्या चमूला यश आले.
- एका रुग्णाकडून एक लिटर ऑक्सिजन वाचविण्याचे लक्ष्य
‘लोकमत’शी बोलताना डॉ. शेलगावकर म्हणाल्या, १ टन लिक्विड ऑक्सिजन म्हणजे ७ लाख लिटर. प्रत्येक कोरोनाच्या रुग्णाला साधाारण दर मिनिटाला ५ लिटर ऑक्सिजन लागते. कोरोना रुग्णाला २४ तास ऑक्सिजनची गरज पडत असल्याने, त्याला ७ हजार २०० प्रति लिटर ऑक्सिजनची आवश्यक्ता असते. १०० रुग्णाला जवळपास ७ लाख २० हजार लिटर ऑक्सिजन लागते. एका रुग्णाकडून जरी एक लिटर ऑक्सिजन बचत केले तरी, १ लाख ४४ हजार लिटर दर दिवशी वाचविणे शक्य होते. बचत केलेले ऑक्सिजन दुसऱ्या रुग्णासाठी जीवनदायी ठरत असल्याने आम्ही यालाच लक्ष्य केले.
- ऑक्सिजन बचतीचे महत्त्व ओळखायला हवे
कुणा रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होऊ नये म्हणून ऑक्सिजन बचतीचे महत्त्व सर्वांनीच ओळखायला हवे. अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्या मदतीने ‘ऑक्सिजन बचत पथक’ तयार केले. रोज ऑक्सिजन गळती शोधून काढण्यापासून रुग्णांची गरज ओळखून ऑक्सिजन पुरवठा करणे, रुग्णांना बेडवरील ऑक्सिजन पुरवठा बंद-चालू करण्याचे प्रशिक्षण देण्याचे कार्य हाती घेतले. परिणामी, महिनाकाठी साधारण २ टन ऑक्सिजनची बचत करण्यात यश आले.
-डॉ. वैशाली शेलगावकर, प्रमुख, बधिरीकरण विभाग मेयो.