क्रिकेट खेळत असताना वीज पडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
By योगेश पांडे | Updated: July 19, 2024 17:55 IST2024-07-19T17:54:45+5:302024-07-19T17:55:25+5:30
Nagpur : वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

16-year-old boy dies due to lightning while playing cricket
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विजांचा कडकडाट सुरू असताना मैदानात जाऊन क्रिकेट खेळणे एका १६ वर्षीय मुलाच्या प्राणावर बेतले. वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
शिवकुमार फकीरा सयाम (१६, महादेवनगर, लाव्हा, वाडी) असे मृतकाचे नाव आहे. गुरुवारी दुपारपासूनच परिसरात ढग दाटून आले होते. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू झाला. मात्र त्या स्थितीतदेखील शिवकुमार क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडला. तो अभिजीत सोसायटीतील टेकडी शिव मंदिरामागील मैदानात क्रिकेट खेळत असताना अचानक जोराचा आवाज करत वीज तो खेळत असलेल्या ठिकाणीच पडली.
त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला घटनास्थळावरील लोकांनी लता मंगेशकर इस्पितळात नेले. मात्र त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याची आई संत्रो फकीरा सयाम यांच्या सूचनेवरून वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडांखाली उभे राहू नये, मोकळे मैदान किंवा शेतातून सुरक्षित जागी जावे असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येते. मात्र त्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते व त्यातूनच प्राणहानीच्या घटना घडतात.