१६ वर्षीय तरुणाचे अवयवदान : तिघांना मिळाले जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 11:24 PM2019-12-02T23:24:52+5:302019-12-02T23:26:45+5:30
अपघातात जखमी होऊन उपचारादरम्यान १६ वर्षीय तरुणाचे ‘ब्रेनडेड’ झाल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळताच त्याच्या आई- वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्या असह्य दु:खातही त्यांनी आपल्या मुलाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपघातात जखमी होऊन उपचारादरम्यान १६ वर्षीय तरुणाचे ‘ब्रेनडेड’ झाल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळताच त्याच्या आई- वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्या असह्य दु:खातही त्यांनी आपल्या मुलाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे यकृत व दोन्ही मूत्रपिंडाचे दान करण्यात आल्याने तिघांना जीवनदान मिळाले.
वेदांत बद्रातीये (१६) रा. हरम गाव, परतवाडा, अमरावती असे त्या अवयवदात्याचे नाव.
वेदांत हा दहावीला होता. हरम गावापासून १० किलोमीटरवर असलेल्या परतवाडा येथे तो मोटरसायकलने शिकवणी वर्गाला यायचा. १८ नोव्हेंबर रोजी शिकवणी वर्गाला येत असताना त्याच्या मोटरसायकलला दुसऱ्या मोटरसायकलने जोरदार धडक दिली. वेदांतच्या डोक्याला जबर मार बसला. त्याला तातडीने अमरावती येथील एका इस्पितळात दाखल केले. येथे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया झाली. परंतु प्रकृती खालावल्याने त्याला नागपूरच्या एका खासगी इस्पितळात हलविण्यात आले. उपचारादरम्यान ब्रेनडेड म्हणजे मेंदूमृत झाल्याची माहिती डॉक्टरांनी वेदांतच्या आई-वडिलांना दिली. मुलगा सोडून गेल्याचे माहीत होताच त्यांना असह्य दु:ख झाले. तेथील डॉक्टरांनी त्यांना अवयवदान करण्याचा सल्लाही दिला. नातेवाईकांनी त्याच स्थितीत वेदांतला अमरावती, परतवाडा येथील भन्साळी रुग्णालयात दाखल केले. येथील डॉ. आशिष भन्साळी यांनीही अवयवदानाचा सल्ला दिला. मृत्यूच्या दाढेत असलेल्या तीन रुग्णांना जीवनदान मिळेल, असे समुपदेशन केले. वेदांतच्या आई आणि वडिलांना ही बाब पटली. त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. लागलीच याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन सेंटर’ (झेडटीसीसी) नागपूरला देण्यात आली. समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. संजय कोलते यांच्यासह माजी सचिव डॉ. रवी वानखेडे, किडनी समितीचे तज्ज्ञ डॉ. एस. जे. आचार्य आणि डॉ. वीरेश गुप्ता यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. सोमवारी सकाळी भन्साळी रुग्णालयात अवयव काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. यकृत व दोन्ही मूत्रपिंडाचे दान करण्यात आले.
परतवाडा ते नागपूर ग्रीन कॉरिडोर
सोमवारी परतवाडा येथील भन्साळी रुग्णालयातून यकृत व दोन्ही मूत्रपिंड ग्रीन कॉरिडोरने नागपुरात आणण्यात आले. यकृत एलेक्सीस हॉस्पिटलमधील ६६ वर्षीय पुरुष रुग्णाला देण्यात आले. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ. प्रकाश जैन व डॉ. अजिताभ श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. एक मूत्रपिंड ऑरेंजसिटी हॉस्पिटलच्या ३९ वर्षीय पुरुष रुग्णाला देण्यात आले. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ. अमित पसारी, डॉ. संदीप देशमुख, डॉ. रोहित गुप्ता आदींनी केली. तर दुसरे मूत्रपिंड वोक्हार्ट हॉस्पिटलमधील ४३ वर्षीय एका महिला रुग्णाला देण्यात आले. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया डॉ. संजय कोलते व डॉ. सूर्यश्री पांडे यांनी केली.
‘एनटीओआरसी’ सेंटर वाढविण्याची गरज
‘ब्रेनडेड’ रुग्णांकडून जास्तीत जास्त अवयवदान व्हायचे असेल तर ‘नॉन ट्रान्सप्लांट ऑर्ग रिट्रीव्हल सेंटर’ (एनटीओआरसी) वाढवायला हवे. भन्साळी रुग्णालयासारख्या ‘एनटीओआरसी’ची आज अवयवाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना गरज आहे.
डॉ. संजय कोलते
सचिव, झेडटीसीसी, नागपूर