रागाच्या भरात १६० बालकांनी सोडले घर
By admin | Published: April 25, 2017 01:59 AM2017-04-25T01:59:49+5:302017-04-25T01:59:49+5:30
लहानपणी चांगले संस्कार मिळाले की मुले संस्कारक्षम होतात. परंतु घरातील परिस्थितीच बालमनावर विपरीत परिणाम करणारी असल्यास बालकांचाही संताप अनावर होतो.
रेल्वेस्थानकावर आढळले : बालमनातील रागाचा होतोय विस्फोट
दयानंद पाईकराव नागपूर
लहानपणी चांगले संस्कार मिळाले की मुले संस्कारक्षम होतात. परंतु घरातील परिस्थितीच बालमनावर विपरीत परिणाम करणारी असल्यास बालकांचाही संताप अनावर होतो. रोजच्या कटकटीतून मुक्त होण्याचे विचार त्यांच्या मनात येतात अन् ठाम निश्चय करून ते घराबाहेर पडतात. होय, जानेवारी ते एप्रिल २०१७ या चार महिन्यात नागपूर रेल्वेस्थानकावर रागाच्या भरात घर सोडून आलेले १६० बालक लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे चाईल्ड लाईनला आढळल्याची धक्कादायक माहिती आहे.
घरातून बाहेर पडल्यानंतर बालक मिळेल ती रेल्वेगाडी पकडून कुठेही जातात. पोलिसांच्या हाती लागले तर ठीक नाही तर या बालकांचे आयुष्यच उद्ध्वस्त होते. असामाजिक तत्त्वांच्या हाती लागून ही बालके चोरी करणे, भीक मागणे या गुन्ह्यांकडे वळतात. देशात अशा प्रकारच्या बालकांचे प्रमाण वाढत असल्यामुळे महिला व बालविकास मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाने २७ जुलै २०१५ पासून देशातील २० रेल्वेस्थानकावर रेल्वे चाईल्ड लाईनचे काम सुरू केले. नागपुरात हे काम वरदान संस्थेच्या अध्यक्षा वासंती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयिका गौरी देशपांडे आणि त्यांची चमू पाहते. रेल्वे चाईल्ड लाईनचे प्रतिनिधी प्लॅटफॉर्मवर बसतात. एखादा बालक एकटा दिसल्यास त्याची चौकशी करतात.
बालक घरातून पळून आल्याचे आढळल्यास त्याच्या पालकांशी संपर्क साधून बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली पालकांच्या स्वाधीन करण्यात येते. चाईल्ड वेलफेअर कमिटीच्या आदेशावरून काही बालकांना निरीक्षण गृहात पाठविण्यात येते. नागपूर रेल्वेस्थानकावर जानेवारी २०१७ मध्ये ३४ बालके, फेब्रुवारीत ४३, मार्चमध्ये ४६ आणि एप्रिल महिन्यात ३७ असे एकूण १६० बालक घर सोडून आल्याची आकडेवारी आहे. यावरून लहान मुलांच्या मनातील रागाचा कसा विस्फोट होतो आहे, याची प्रचिती येते. रेल्वे चाईल्ड लाईनच्या माध्यमातून या बालकांना गुन्हेगारी जगताकडे जाण्यास परावृत्त करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मोलाचे काम होत आहे.
ही आहेत घर सोडण्याची कारणे
नागपुरात देशाच्या चारही दिशांनी रेल्वेगाड्या येतात. त्यामुळे बहुतांश बालक घर सोडल्यानंतर येथे पोहोचतात. घरातून बाहेर पडलेल्या बालकात वडिलांनी अभ्यासासाठी रागावणे, क्षुल्लक कारणावरून रागावणे, वडिलांकडून दारू पिऊन मारहाण, आईवडिलांमध्ये दररोज होणारे भांडण ही मुख्य कारणे आहेत. तर शाळकरी १४ ते १७ या वयोगटातील अनेक मुले-मुली प्रेमात पडल्यामुळे पळून जाताना आढळतात.
अनेकांची नसते घरी परतण्याची इच्छा
पळून आलेल्या बालकांपैकी अनेक बालकांची घरी परतण्याची इच्छा नसते. त्यामुळे अशा बालकांना बाल कल्याण समिती जे. जे. अॅक्टनुसार निरीक्षणगृहात पाठविते. निरीक्षणगृहात पाठविताना या बालकांचे मूळ वातावरणात बदल होऊ नये यासाठी त्यांच्या राज्यातील निरीक्षणगृहात पोलिसांच्या संरक्षणात या बालकांना दाखल करण्यात येते.
रेल्वे चाईल्डलाईनची आरपीएफला मदत
पूर्वी रेल्वेस्थानकावर घरून पळून आलेले बालक आढळल्यास आणि त्यांच्या पालकांचा पत्ता नसल्यास या बालकांना सांभाळण्याचे काम आरपीएफला करावे लागत होते. परंतु रेल्वे चाईल्ड लाईनची सुरुवात झाल्यामुळे आरपीएफ कागदोपत्री कारवाई करून या बालकांना रेल्वे चाईल्ड लाईनकडे सोपविते. रेल्वे चाईल्ड लाईनमुळे आरपीएफचे काम सोपे झाले आहे.’
-ज्योती कुमार सतीजा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त,
आरपीएफ, मध्य रेल्वे नागपूर विभाग