राज्यातील पुलांच्या दुरुस्तीसाठी हुडकोकडून १६०० कोटींचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 09:27 PM2017-12-15T21:27:14+5:302017-12-15T21:29:37+5:30
सावित्री पूल वाहून जाण्याच्या दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील पाच हजार पुलांचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ केले. या पुलांच्या दुरुस्तीसाठी चार हजार कोटींची गरज आहे. पहिल्या टप्प्यात हुडकोकडून १ हजार ६०० कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : सावित्री पूल वाहून जाण्याच्या दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील पाच हजार पुलांचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ केले. या पुलांच्या दुरुस्तीसाठी चार हजार कोटींची गरज आहे. पहिल्या टप्प्यात हुडकोकडून १ हजार ६०० कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
साखरगावजवळील गुंजवणी नदीवरील पूल धोकादायक झाल्याबाबतचा प्रश्न संग्राम थोपटे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पाटील म्हणाले, हा पूल किती उंच केला पाहिजे हे तपासून त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात येईल. आगामी अर्थसंकल्पामध्ये या कामाचा समावेश करून ज्या दिवशी अर्थसंकल्प मंजूर केला जाईल त्याच दिवशी या कामाची निविदा प्रसिद्ध केली जाईल. तत्पूर्वी निविदा काढण्याच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन पाटील यांनी दिले.
राज्यातील ४०० पुलांवर सॉफ्टवेअर बसविण्यात आले असून त्याच्या मदतीने पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्यानंतर पुलावरून पाणी वाहून जात असेल तर जिल्हा प्रशासनाला एसएमएस जातो. त्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी या पुलावरील वाहतूक बंद करतात, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
छत्रपतींच्या स्मारकासाठी तीन निविदा प्राप्त
पाटील यांनी सांगितले की, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामासाठी सर्व परवानग्या मिळाल्या असून या कामासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या आहेत. त्यातील सर्वात कमी दराच्या निविदाधारकाशी वाटाघाटी करून ते मंत्रिमंडळासमोर सादर केले जाईल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम मार्गी लागले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.