१,६१० शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:08 AM2021-02-27T04:08:36+5:302021-02-27T04:08:36+5:30
कैलास निघाेट लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : राज्य शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाने रामटेक तालुक्यात पाच धान खरेदी केंद्र सुरू ...
कैलास निघाेट
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : राज्य शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाने रामटेक तालुक्यात पाच धान खरेदी केंद्र सुरू केले. या केंद्रांवर किमान आधारभूत किमतीने धानाची खरेदी केली जात असल्याने तालुक्यातील २,०८० शेतकऱ्यांनी धानाची विक्री करण्यासाठी शासनाकडे ‘ऑनलाईन’ नाेंदणी केली हाेती. यातील ४७० शेतकऱ्यांकडील धानाचे माेजमाप करण्यात आले असून, १,६१० शेतकरी धान विक्रीसाठी प्रतीक्षेत आहेत. त्यातच गाेदाम फुल्ल झाल्याचे कारण सांगून तीन खरेदी केेंद्र बंद करण्यात आल्याने सध्या दाेनच केंद्रांवर धानाची खरेदी सुरू आहे. धानाचे माेजमाप कधी हाेणार, या विवंचनेत शेतकरी आहेत.
रामटेक तालुक्यात आदिवासी विकास महामंडळामार्फत डाेंगरी, हिवराबाजार, बेरडेपार (महादुला), पवनी, बांद्रा व बेलदा (टुयापार) येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले हाेते. यातील डाेंगरी केंद्रावर एकाही शेतकऱ्याने नाेंदणी न केल्याने ते केंद्र सुरू करण्यात आले नाही. उर्वरित पाच केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी एकूण २,०८० शेतकऱ्यांनी नाेंदणी केली. यातील ४७० शेतकऱ्यांकडील धानाचे माेजमाप पूर्ण करण्यात आले. उर्वरित १,६१० शेतकऱ्यांकडील धानाचे माेजमाप हाेण्यापूर्वीच पवनी, बांद्रा व बेलदा (टुयापार) या केंद्रांचे गाेदाम पूर्ण झाल्याने तिथे धानाची पाेती ठेवायला जागा नसल्याचे सांगून तिन्ही केंद्र २५ दिवसांपूर्वीच बंद करण्यात आले.
...
गाेदाम फुल्ल, खरेदी बंद
धानाचे माेजमाप करण्यात आलेल्या ४७० शेतकऱ्यांमध्ये १६१ आदिवासी तर ३०९ गैरआदिवासी शेतकरी आहेत.
पवनी खरेदी केंद्र डिसेंबरमध्ये सुरू करण्यात आले हाेते. या केंद्रावर ५१० शेतकऱ्यांनी नोंदणी केली हाेती. यातील १४३ शेतकऱ्यांकडून ४,४७४.४० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. बांद्रा येथील खरेदी केंद्र जानेवारीमध्ये सुरू करण्यात आले. येथे सर्वाधिक ६५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नाेंदणी केली हाेती. यातील केवळ ६० शेतकऱ्यांकडून २,२५६.४० क्विंटल धान खरेदी करण्यात आला. बेलदा (टुयापार) केंद्रावर नाेंदणीकृत ३३० शेतकऱ्यांपैकी केवळ ६३ शेतकऱ्यांकडून २,४९८.४० क्विंटल धान खरेदी करण्यात आला. हे तिन्ही धान खरेदी केंद्र गाेदामात धानाची पाेती ठेवायला जागा नसल्याने बंद केली आहेत. हिवराबाजार येथील खरेदी केंद्र ११ फेब्रुवारीला सुरू करण्यात आले असून, येथे १४० शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नाेंदणी केली. यातील ३८ शेतकऱ्यांकडून १,२८३.२० क्विंटल तर बेरडेपार (महादुला) केंद्रावरील नाेंदणीकृत ५५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांपैकी सर्वाधिक १६६ शेतकऱ्यांकडून ५,७४९.६० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.
...
२.५७ काेटींचे चुकारे प्रलंबित
यावर्षी धान खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब करण्यात आला. पाच खरेदी केंद्रांपैकी पवनी केंद्र वगळता अन्य केंद्रांवरील शेतकऱ्यांना अद्यापही धानाचे चुकारे मिळाले नाहीत. पवनी खरेदी केंद्रावर ८३ लाख ५८ हजार १७९ रुपयांची धान खरेदी करण्यात आली असून, यातील ५९ शेतकऱ्यांना ५० लाख २५ हजार ६६७ रुपयांचे चुकारे देण्यात आले. उर्वरित ८४ शेतकऱ्यांचे ३३ लाख ३२ हजार ५१२ रुपयांचे चुकारे आदिवासी विकास महामंडळाकडे थकीत आहेत. बांद्रा केंद्रावरील शेतकऱ्यांचे ४२ लाख १४ हजार ९५५ रुपये, बेलदा केंद्रावरील शेतकऱ्यांचे ४६ लाख ६७ हजार ११ रुपये, बेरडेपार (महादुला) येथील शेतकऱ्यांचे १ कोटी ७ लाख ४० हजार २५२ रुपये तर हिवराबाजार केंद्रावरील शेतकऱ्यांचे २३ लाख ९७ हजार १७ रुपयांचे अर्थात सर्व केंद्रावरील शेतकऱ्यांचे एकूण ३ कोटी ७ लाख २६ हजार ७३२ रुपयांपैकी २ कोटी ५७ लाख १ हजार ६५ रुपयांचे चुकारे आदिवासी विकास महामंडळाकडे थकीत आहेत.