१६.२३ कोटींचा टेकडी उड्डाणपूल पाडण्यासाठी ३.८ कोटींचा खर्च, सहा पदरी रस्ता बांधणार

By मोरेश्वर मानापुरे | Published: August 19, 2023 03:49 PM2023-08-19T15:49:01+5:302023-08-19T15:49:57+5:30

२२ मेट्रिक टन मलबा : पूल जमीनदोस्त करण्यास एक महिन्याचा कालावधी लागला

16.23 crores will cost 3.8 crores to demolish the hill flyover, construct a six-lane road | १६.२३ कोटींचा टेकडी उड्डाणपूल पाडण्यासाठी ३.८ कोटींचा खर्च, सहा पदरी रस्ता बांधणार

१६.२३ कोटींचा टेकडी उड्डाणपूल पाडण्यासाठी ३.८ कोटींचा खर्च, सहा पदरी रस्ता बांधणार

googlenewsNext

नागपूर : सन २००८ मध्ये नागपूर महानगरपालिकेने १६.२३ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या टेकडी उड्डाणपूलाला पाडण्यासाठी ३.८ कोटी रुपयांचा खर्च आला. हे काम मुंबई येथील मत्ते अ‍ॅण्ड असोसिएट्सने नऊ अवजड मशीनच्या सहाय्याने एक महिन्यात पूर्ण केले. आता या ठिकाणी सहा पदरी रस्ता बांधण्यात येणार आहे.

उड्डाणपूलाखाली होती १७५ दुकाने

८१२ मीटर लांब आणि १०.५ मीटर रूंद टेकडी उड्डाणपूल नागपूर मनपाने २००८ साली तयार केला होता. उड्डाणपुलाखाली एकूण १७५ दुकाने बांधण्यात आली होती. जयस्तंभ चौक परिसरातील वाहतूक कोंडी लक्षात घेता व वाहतुकीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जयस्तंभ चौकाच्या आजूबाजूच्या रस्त्याच्या परिसरात योग्य ते बदल करण्याचे प्रस्तावित करत योजना आखण्यात आली. उड्डाणपुलाखालील दुकाने रिकामी करून मेट्रोने बांधलेल्या कॉम्प्लेक्समध्ये स्थलांतरित करण्यात आली होती. पूल पाडण्याची परवानगी नागपूर मनपाने महामेट्रोला प्रदान केली होती.

उड्डाणपूल तोडण्याचे कंत्राट ३.८ कोटीला

पूल तोडण्याचे कंत्राट मत्ते कन्स्ट्रक्शन कंपनीला ३.८ कोटी रुपयांत देण्यात आले. पूल १५ दिवसांत तोडायला होता. पण पूलालगतच्या रस्त्यावर दररोज सुरू असलेली वाहतूक आणि पावसामुळे पूल जमीनदोस्त करण्यास एक महिन्याचा कालावधी लागला. पूलाच्या तोडकामातून २२ मेट्रिक टन मलबा निघाला. विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल टेक्नॉलॉजीद्वारे (व्हीएनआयटी) संपूर्ण प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

मत्ते अ‍ॅण्ड असोसिएट्सला २५ उड्डाणपूल पाडण्याचा अनुभव

कंपनीने आतापर्यंत नवीन बांधकामासाठी देशभरातील जवळपास २५ जुने उड्डाणपूल पाडले आहेत. टेकडी उड्डाणपूलाचे तोडकाम टेकडी मंदिर एक दिवसही बंद न ठेवता सुरू ठेवले. मुख्यत्त्वे दिवसात केवळ पाच तास काम चालायचे. मध्यप्रदेश परिवहन विभागाची रात्री ११ ची बस सुटल्यानंतर काम सुरू व्हायचे आणि पहाटे ५ ची बस सुटण्याआधी काम बंद करून रस्त्यावरून मलबा उचलला जायचा. तोडकाम करताना कुणालाही इजा झाली नाही. याआधी नागपुरात छत्रपती चौक उड्डाणपूल वेळेच्या आत तोडला होता.

- देवेंद्र मत्ते, मत्ते अ‍ॅण्ड असोसिएट्स, मुंबई

Web Title: 16.23 crores will cost 3.8 crores to demolish the hill flyover, construct a six-lane road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.