१६,२४९ वीज ग्राहकांनी निवडला गो-ग्रीनचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2023 07:55 PM2023-02-10T19:55:56+5:302023-02-10T19:59:36+5:30
Nagpur News नागपूर परिमंडळात एकूण १६,२४९ ने गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडला आहे. यात सर्वाधिक ११,३३२ वीज ग्राहक नागपूर शहरातील आहेत.
नागपूर : महावितरणच्या नागपूर परिमंडळातील १६,२४९ ग्राहकांनी गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडून कागदाच्या बिलास नकार दिला. या सर्व ग्राहकांना आता ई-मेल किंवा एसएमएसच्या माध्यमातून वीज बिल प्राप्त होत आहे. ग्राहकांना प्रत्येक बिलावर १० रुपये लाभ मिळत आहे. यामुळे ग्राहकांची वर्षाची १२० रुपयाने बचत होत आहे.
नागपूर परिमंडळात एकूण १६,२४९ ने गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडला आहे. यात सर्वाधिक ११,३३२ वीज ग्राहक नागपूर शहरातील आहेत. नागपूर ग्रामीणमध्ये २४५५ व वर्धा जिल्ह्यात २४६२ ग्राहकांनी सुद्धा या पर्यायाची निवड केली आहे. कागदाऐवजी ई-मेल व एसएमएसने बिल प्राप्त करण्याचा पर्याय निवडल्यास प्रत्येक बिलावर १० रुपयाची सूट मिळते. त्यानुसार ग्राहक यातून वर्षाला १२० रुपयाची सूट प्राप्त करीत आहेत.
कंपनीने इतर ग्राहकांनाही गो-ग्रीनचा पर्याय निवडण्याचे आवाहन केले आहे. गो ग्रीनचा पर्याय निवडलेल्या ग्राहकांना कागदी वीज बिल पाठवणे बंद केले जाईल. ग्राहक महावितरणच्या वेबसाईटवर किंवा मोबाइल ॲपवर जाऊन गो-ग्रीनचा पर्याय निवडू शकतात. यात ग्राहकांना वीज बिल तातडीने उपलब्ध होऊ शकतील.