भाजपसोबत १६४ आमदार; सरकारला धोका नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2022 06:45 PM2022-10-27T18:45:02+5:302022-10-27T18:46:09+5:30
Nagpur News भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र सरकारला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट केले.
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला समर्थन देणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी १ नोव्हेंबरला वेगळा निर्णय घेण्याचा इशारा दिला असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र सरकारला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट केले. भाजपसोबत १६४ आमदार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे हे आपले कार्यकर्ते तुटू नयेत, यासाठी सरकार पडण्याच्या वल्गना करीत असून यासाठीच संभ्रम निर्माण करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, मी राज्यभर दौरा करीत आहे. प्रत्येक दौऱ्यात या तीनही पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत. भाजपकडे फ्लो वाढत चालला आहे. त्यामुळे या तीनही पक्षांतील नेते अस्वस्थ आहेत.
कडू- राणा वाद मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मिटवतील
आ. बच्चू कडू व रवी राणा हे दोघेेही समजदार नेते आहेत. त्यांच्यात काही गैरसमज निर्माण झाले आहेत. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या दोघांनाही एकत्र बसवून वाद मिटवतील, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.